गडचिरोली, प्रतिनिधी :-
राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या ‘महाआरोग्य सन्मान २०२६’ पुरस्काराने गडचिरोली जिल्ह्याचा गौरव झाला आहे. मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील शल्य चिकित्सक डॉ. कृणाल चेंडकापुरे यांनी २०२५-२६ या कालावधीत ११७ हायड्रोसिल शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करून उल्लेखनीय कामगिरी नोंदवली. दुर्गम जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रक्रिया स्थानिक पातळीवर झाल्याने रुग्णांना मोठ्या शहरांकडे जाण्याची गरज कमी झाली आहे.
ग्रामीण रुग्णालय, मुलचेरा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्मिता साळवे यांनी ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ मोहिमेअंतर्गत माता-बाल आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी विशेष योगदान दिल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
तसेच चामोर्शी ग्रामीण रुग्णालयालाही संस्थात्मक स्तरावर उत्कृष्ट आरोग्य सेवा, प्रसूती सेवा, शस्त्रक्रिया व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी याबद्दल सन्मानित करण्यात आले.
या राज्यस्तरीय गौरवामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य विभागाचे मनोबल उंचावले असून दुर्गम भागातही गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याचा संकल्प अधिक बळकट झाला आहे.
Back to top button