आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीय

विधान परिषद निवडणुकीतून शिवानी वडेट्टीवार माघारी; काँग्रेससमोर उमेदवाराचा नवा पेच

उदय धकाते

गडचिरोली :-

चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या आगामी विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असताना अखेर त्यांना उमेदवारी प्रक्रियेतून माघार घ्यावी लागली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या नियमानुसार आवश्यक वयोमर्यादेपेक्षा त्यांचे वय एक महिना कमी भरत असल्याने त्यांची उमेदवारी आपोआप बाद झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

काँग्रेस पक्षाकडून या निवडणुकीसाठी शिवानी वडेट्टीवार यांचे नाव सर्वात आघाडीवर मानले जात होते. काही दिवसांपूर्वीच राजस्थानमध्ये त्यांचा शाही विवाह सोहळा पार पडला होता. त्या पार्श्वभूमीवर त्या पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेत आल्या होत्या. विजय वडेट्टीवार यांच्या कन्या म्हणून त्यांना राजकीय वारसा लाभला असून, काँग्रेसच्या युवा चेहऱ्यांपैकी एक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.

मात्र, नियमानुसार वयाची अट पूर्ण न झाल्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. विशेषतः चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, आता काँग्रेस पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या प्रतिष्ठेच्या निवडणुकीसाठी कोणत्या उमेदवारावर विश्वास दाखवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या तळागाळातील कार्यकर्त्यांकडून जोर धरत आहे. जिल्ह्यातील निष्ठावान आणि पक्षासाठी सातत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळावी, अशी भावना व्यक्त होत आहे.

या निवडणुकीत धनशक्तीचा मोठा प्रभाव राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी विविध पक्षांकडून हालचाली सुरू झाल्या असून काही मतदारांना सहली व विशेष पॅकेज देण्यात येत असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. अनेक मतदार आपल्या क्षेत्रातून ‘नॉट रिचेबल’ झाल्याच्या चर्चा राजकीय गलियार्‍यात सुरू असून, या निवडणुकीत प्रत्येक मताला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे मतांची किंमत वाढल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत असून आगामी निवडणुकीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker