गडचिरोली, प्रतिनिधी :-
जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरणात उत्साहाची नवी ऊर्जा निर्माण करणारा भव्य शेतकरी मेळावा तसेच काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष पदग्रहण सोहळ्याचा कार्यक्रम गडचिरोली येथे जल्लोषात पार पडला. काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झालेल्या एडव्होकेट विश्वजित कोवासे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात गर्दी केली होती. संपूर्ण परिसर घोषणांनी, टाळ्यांच्या गजराने आणि रॅली च्या जल्लोषाने गडचिरोली शहर दुमदुमून गेला होता.

कार्यक्रमाला माजी विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयभाऊ वडेट्टीवार प्रमुख उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात एडव्होकेट विश्वजित कोवासे यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त करताना सांगितले की,
“विश्वजित कोवासे हे अभ्यासू, संयमी आणि सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडून काम करणारे नेतृत्व आहे. ते निश्चितच गडचिरोली जिल्ह्याला सक्षम नेतृत्व देतील. काँग्रेस संघटना तळागाळापर्यंत पोहोचवून सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारे जिल्हाध्यक्ष म्हणून ते पुढे येतील, त्यांना आम्ही संसद आणि विधानसभा मध्ये लवकरच पाठवू अशी ग्वाही दिली. त्यांच्या प्रामाणिक पणावर ठाम विश्वास आहे.”
विजयभाऊ वडेट्टीवार यांनी पुढे सांगितले की, आजच्या काळात जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे आणि संघर्षातून नेतृत्व निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व दुर्मिळ झाले आहे. मात्र विश्वजित कोवासे यांनी युवक, शेतकरी, आदिवासी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने काम केले असून त्यांची प्रतिमा लोकाभिमुख नेत्याची आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात आमदार रामदासजी मसराम यांनीही उपस्थित राहून विश्वजित कोवासे यांचे अभिनंदन केले. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतीसमोरील समस्या, उत्पादन खर्च, बाजारभाव आणि शेतकरी हिताच्या योजनांवर चर्चा केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी एडव्होकेट विश्वजित कोवासे यांनी आपल्या मनोगतात पक्ष नेतृत्वाचे आभार मानत गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. “सामान्य कार्यकर्ता हाच पक्षाचा खरा आधार आहे. शेतकरी, आदिवासी, युवक आणि वंचित घटकांच्या न्यायासाठी मी सदैव लढत राहीन. प्रत्येक गावात काँग्रेसची विचारधारा पोहोचवून संघटना अधिक सक्षम करणार,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
कार्यक्रमात शेतकरी हिताचे विविध विषय, शेतीसमोरील आव्हाने, बेरोजगारी, ग्रामीण विकास तसेच संघटन बळकटीकरणावर सखोल चर्चा करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी एकजुटीने काम करून जिल्ह्यात काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या प्रसंगी माजी विरोधी पक्ष नेते तथा गटनेते विजयभाऊ वडेट्टीवार, प्रदेश सचिव कुणाल चौधरी, भारतीय राष्ट्रीय सचिव अजय चीकारा, आमदार अभिजीत वंजारी, प्रदेशाध्यक्ष आदिवासी काँग्रेस वसंतराव पुरके, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार देवराव भांडेकर, जिल्हाध्यक्ष विश्वजित कोवासे, माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडलवार, पंकज गुडेवार, रामभाऊ मेश्राम, बंडू शनिवारे, रवींद्र दरेकर, प्रकाशभाऊ इटनकर, हनुमंत मडावी, वामनराव सावसागडे, समशेर खा पठाण, नगरसेवक राजूभाऊ राशेकर, नगरसेवक विकास प्रधान, नगरसेवक श्याम उईके यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळाला. विश्वजित कोवासे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात नवी दिशा मिळेल, अशी भावना उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button