कृषी व व्यापारताज्या घडामोडीदेश विदेश

जमीन अधिग्रहणाविरोधात हजारो शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

बैलबंडी, कुटुंब आणि शिधासह आंदोलनस्थळी दाखल; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही

गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली तालुक्यातील हिरापूर, गुरुवळा, राखी आणि शिरपूरचक येथे प्रस्तावित विमानतळासाठी होणाऱ्या जमीन अधिग्रहणाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. तसेच चामोर्शी तालुक्यातील प्रस्तावित एमआयडीसीसाठी भेंडाळा परिसरातील १४ गावांनीही आपल्या शेतजमिनी देण्यास नकार दिला आहे. याशिवाय जयरामपूर परिसरातील आणखी १३ गावांच्या जमीन अधिग्रहणासंदर्भात शासनाने प्रक्रिया सुरू केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

या धोरणाच्या निषेधार्थ यापूर्वी शेतकऱ्यांनी शासन निर्णयाची होळी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन, धरणे आंदोलन तसेच विविध निवेदने देऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शासन शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेण्यास तयार नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

शेतकऱ्यांनी केवळ जमीन अधिग्रहणाचाच नव्हे तर जिल्ह्यात वाढलेल्या रानटी हत्तींच्या उपद्रवाचाही प्रश्न आंदोलनाद्वारे मांडला आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून हत्तींच्या सततच्या वावरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. हत्तींच्या कायमस्वरूपी बंदोबस्तासाठी वारंवार मागणी करूनही प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्या नसल्याची खंत आंदोलकांनी व्यक्त केली.

या सर्व मागण्यांसाठी आणि सुपीक शेतजमिनींचे अधिग्रहण थांबवून पर्यायी जागांचा वापर करावा, या प्रमुख मागणीसाठी ४ जून २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघर्ष कृती समिती च्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

या आंदोलनात शेतकरी बांधव कुटुंबासह बैलबंडी, अन्नधान्य व आवश्यक शिधा घेऊन आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. शेतकरी नेते महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

आंदोलनाला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था व समाज संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी यांच्यासह विविध समाज संघटनांचा समावेश आहे.

ठिय्या आंदोलनात शेतकरी नेते महेंद्र ब्राह्मणवाडे, रामदास मसराम, डॉ. अनंता कुंभारे, दिवाकर निसार, अनिल कोठारे, सुनील कोहपरे, सुभाष कोठारे, रमेश मडावी, रामदास कुकुडकर, गुरुदास ठाकरे, सुभाष किरंगे, कैलास बांबोडे, मयूर मेश्राम यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

तसेच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विश्वजीत मारोतराव कोवासे, आरपीआय नेते रोहिदास राऊत, शिवसेना नेते सुनील केदारी, शिवसेना जिल्हाध्यक्ष वासुदेव शेडमाके, युवा नेते पवन गेडाम, कम्युनिस्ट पक्षाचे अमोल मारकवार, बीएसपीचे मेश्राम यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, महिला, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही,” असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला असून जिल्ह्यातील जमीन अधिग्रहणाचा प्रश्न आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker