गडचिरोली, प्रतिनिधी :-
केंद्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या फिट इंडिया मूव्हमेंट अंतर्गत जागतिक सायकल दिनानिमित्त रविवार, दि. ७ जून २०२६ रोजी ‘Sunday on Cycle’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आरोग्यदायी जीवनशैली, नियमित व्यायाम आणि पर्यावरणपूरक वाहतुकीबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली व सायकल स्नेही मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
जागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम केंद्र पुरस्कृत खेलो इंडिया आर्चरी केंद्र, महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, जिल्हा क्रीडा संकुल कॉम्प्लेक्स तसेच जिल्ह्यातील आरमोरी, अहेरी, वडसा, मुलचेरा, चामोर्शी आणि कोरची येथे एकाचवेळी आयोजित करण्यात येणार आहे.
सर्व ठिकाणी रविवार, दि. ७ जून २०२६ रोजी सकाळी ७ वाजता सायकल रॅलीला सुरुवात होणार असून तालुका क्रीडा संयोजकांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायकल चालविण्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती वाढते, हृदयविकार व जीवनशैलीशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो तसेच पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागतो. त्यामुळे ‘Sunday on Cycle’ या विशेष उपक्रमात जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी, नागरिक, स्थानिक अधिकारी-कर्मचारी, खेळाडू तसेच युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भास्कर घटाळे यांनी केले आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून फिट इंडिया अभियानाला अधिक बळ मिळणार असून, सायकलिंग संस्कृतीला चालना देत निरोगी आणि तंदुरुस्त समाज घडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button