सिरोंचा, वार्ताहर :-
सिरोंचा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झालेला वीजपुरवठा अखेर पूर्ववत करण्यात आला असून, आलापल्ली–सिरोंचा ६६ केव्ही अतिउच्चदाब वाहिनीवरील तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी पथकांनी युद्धपातळीवर काम केल्याची माहिती संबंधित यंत्रणेकडून देण्यात आली.
माहितीनुसार, आलापल्ली येथील १३२/६६ केव्ही उपकेंद्रातून सिरोंचा येथील ६६ केव्ही उपकेंद्रापर्यंत जाणारी सुमारे ९३ किलोमीटर लांबीची अतिउच्चदाब वाहिनी वादळी वाऱ्यांमुळे बाधित झाली होती. वनक्षेत्रातून जाणाऱ्या या वाहिनीवर अनेक ठिकाणी मोठी झाडे कोसळल्याने तांत्रिक बिघाड निर्माण झाला होता. परिणामी सिरोंचा परिसरातील सहा उपकेंद्रांचा वीजपुरवठा प्रभावित झाला होता.
बिघाडाची माहिती मिळताच अतिउच्चदाब विभागाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीची कामे सुरू केली. प्रतिकूल हवामान आणि दुर्गम वनक्षेत्रातील अडचणींवर मात करत वाहिनीवरील विविध दोष टप्प्याटप्प्याने दूर करण्यात आले. अनेक ठिकाणी झाडे हटवून तांत्रिक दुरुस्ती पूर्ण करण्यात आली. त्यानंतर प्रभावित भागातील वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला.
दरम्यान, आलापल्ली–एटापल्ली दरम्यानची १३२ केव्ही वाहिनीदेखील वादळामुळे काही काळ बंद पडली होती. या वाहिनीवरील एका टॉवरचा क्रॉस-आर्म वाकल्याने तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. आवश्यक दुरुस्ती केल्यानंतर ही वाहिनीही कार्यान्वित करण्यात आली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित उपकेंद्रांमधील यंत्रणा आणि उपकरणांची तपासणी करण्यात आली असून सर्व उपकेंद्रे सुरळीत स्थितीत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्यामागे उपकेंद्रांतील बिघाड नसून अतिउच्चदाब वाहिनीवरील तांत्रिक दोष कारणीभूत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रशासन आणि वीज विभागाच्या समन्वयातून दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्याने सध्या सिरोंचा तालुका आणि परिसरातील वीजपुरवठा सुरळीत सुरू झाला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button