आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीय
काँग्रेसतर्फे गडचिरोलीत चक्का जाम आंदोलन;
विद्यार्थ्यांवरील अन्याय कदापि खपवून घेणार नाही – जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे

गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमितता, NEET पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-युवकांवरील कथित लाठीमाराचा निषेध तसेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ गडचिरोली येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे म्हणाले, “विद्यार्थ्यांवरील अन्याय काँग्रेस पक्ष कदापि खपवून घेणार नाही. देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करावी. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर लाठीमार करणे ही लोकशाहीविरोधी बाब असून आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो.”
ते पुढे म्हणाले, “विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यासाठी पोलिसांचा वापर करून आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न झाला, तरी काँग्रेस पक्ष दबावाला बळी पडणार नाही. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही सातत्याने संघर्ष करत राहू.”
काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, आंदोलनादरम्यान जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे यांच्यासह काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. यावेळीही आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला.
आंदोलनादरम्यान NEET पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा तसेच विद्यार्थी-युवकांवरील कथित लाठीमाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशा मागण्या करण्यात आल्या.



