आपला जिल्हा

९ डिसेंबरला उलगुलान महामोर्चा

प्रागतिक पक्षांचे आवाहन

गडचिरोली,प्रतिनिधी :-  

विकासाच्या नावावर गडचिरोली जिल्ह्यातील हजारो एकरवरील जंगलतोड करुन पाचव्या अनुसूची क्षेत्रातील विशेष तरतुदी आणि कायदे, नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीरपणे मंजूर आणि प्रस्तावित लोह खाणी आणि अन्याय अत्याचाराच्या विरोधात हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ९ डिसेंबर रोजी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र च्या वतीने उलगुलान महामोर्चा काढण्यात येणार असून या महामोर्चात जिल्ह्यातील आदिवासींसह गैरआदिवासी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रागतिक पक्षांनी केले आहे.

गैरआदिवासी, ओबीसीच्या १९ टक्के आरक्षणाला आदिवासी समाजाने कधीच विरोध केलेला नसतांना भाजपने पेसा कायदा विरोधी वातावरण जिल्ह्यात  निर्माण करुन वेळोवेळी समाजात तेढ निर्माण केली आणि बेकायदेशीर खाणींचे रोजगाराच्या नावावर समर्थन करुन जिल्ह्याला उध्दवस्त करण्याचे षडयंत्र रचले असून हे सर्व प्रयत्न हाणून पाडण्यासाठी हा महामोर्चा काढण्यात येणार आहे. आदिवासी समाजाच्या खांद्याला खांदा लावून दलित, ओबीसी, भटके विमुक्त आणि जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामसभा मोठ्या संख्येने सहभागी होणार असून या महामोर्चाचे नेतृत्व शेतकरी कामगार पक्षाचे आमदार भाई जयंत पाटील, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पाॅलिट ब्युरो सदस्य काॅ. अशोक ढवळे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव काॅ. डॉ.भालचंद्र कांगो, राज्य सचिव काॅ. ॲड. सुभाष लांडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी, बीआरएसपीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश माने, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष बाळासाहेब खोब्रागडे, गोंडवाना गणतंत्र पार्टी चे प्रदेशाध्यक्ष हरिषदादा उईके हे करणार आहेत. आमदार शामसुंदर शिंदे, आमदार काॅ. विनोद निकोले, आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर, आमदार देवेंद्र भुयार यांचेसह जनता दल (सेक्युलर) चे नाथाभाऊ शेवाळे, शामदादा गायकवाड, भाकपा ( माले) लिबरेशन पार्टीचे काॅ. श्याम गोहील, श्रमिक मुक्ती दलाचे काॅ. भारत पाटणकर, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे काॅ. किशोर ढमाले हे प्रामुख्याने या महामोर्चात सहभागी होणार आहेत.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker