गडचिरोली, प्रतिनिधी :-
जिल्ह्यातील अवैध अंमली पदार्थ कारवायांवर आळा घालण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करत धानोरा पोलीस ठाणे हद्दीतील परसवाडी येथे गांजाची लागवड करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेतले. आरोपीच्या शेतातून तब्बल 27 लाख 25 हजार रुपयांचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या विशेष निर्देशानुसार जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करी व इतर अवैध कारवायांविरोधात कठोर कारवाई सुरू आहे. त्याच अनुषंगाने दिनांक 6 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा व धानोरा पोलीस पथकाने संयुक्त कारवाई करत मौजा परसवाडी येथे छापा टाकला.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मोरेश्वर हिरामण उसेंडी (वय 58, रा. परसवाडी, ता. आरमोरी) यांच्या शेतात पंचासमक्ष झडती घेतली असता, गांजाची लागवड आढळून आली. तपासणीदरम्यान शेतातून एकूण 54.5 किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे 27,25,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपीने विक्रीच्या उद्देशाने स्वतःच्या शेतात गांजाची लागवड केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध धानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 62/2026 अंतर्गत एनडीपीएस कायदा 1985 मधील कलम 8 (क), 20 (ब), 20 (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक टेभुर्णे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा व गोकुल राज यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button