अपघातताज्या घडामोडी

गडचिरोली-उमरखेड एसटी बसचा भीषण अपघात; ७ महिन्यांच्या चिमुकल्यासह 3 जणांचा मृत्यू, ३३ प्रवासी जखमी

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोलीहून उमरखेडकडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचा गुरुवारी सकाळी भीषण अपघात झाला. गडचिरोली मुख्यालयापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावरील नवेगाव-मुरखळा परिसरातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव बसने लोखंडी कठडा तोडत रस्त्याच्या कडेला शेतात पलटी घेतली. या दुर्दैवी अपघातात ७ महिन्यांच्या चिमुकल्यासह 3 जणांचा मृत्यू झाला असून ३३ प्रवासी जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात येत आहे.

मृतांमध्ये ख्वाजा शाहबुद्दीन (६०, रा. देसाईगंज), लक्ष्मीबाई दुरकीवार (५५, रा. नवरगाव) यांचा समावेश आहे. तर गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू असलेल्या शिवांश नवघरे या सात महिन्यांच्या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोलीहून उमरखेडकडे निघालेल्या एसटी बसचे अचानक नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की घटनास्थळी एकच आक्रोश उसळला. बसमधील महिला, पुरुष तसेच लहान मुले गंभीर जखमी झाली. या दुर्घटनेत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अविनाश पाल यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली असून गडचिरोलीतील प्रतिष्ठित नागरिक डॉ. गणेश जैन हे देखील बसमध्ये प्रवास करत होते.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, बस भरधाव वेगात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि काही क्षणातच बस पलटी झाली. अपघातानंतर चालक रोहित देशमुख (रा. अकोला) याने पोलिसांना दिलेल्या माहितीत बससमोर अचानक काही आले होते का, हे स्पष्ट आठवत नसल्याचे सांगितले. तर वाहक संदीप पवार तिकीट वितरणात व्यस्त असल्याने अपघातापूर्वी नेमके काय घडले याची माहिती त्यालाही देता आली नाही.

दरम्यान, परिवहन विभाग आणि पोलिसांच्या प्राथमिक तपासात अपघातग्रस्त बस नवीन व चांगल्या स्थितीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे निष्काळजीपणे वाहन चालविणे किंवा बसचा वेग अधिक असणे, ही अपघातामागील संभाव्य कारणे असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलिस प्रशासनाकडून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

या अपघातात धनश्री ललित चांदेकर, आशिष संघपाल साखरकर, मायाबाई बाबुराव कांबळे, संगीता बाबुराव कांबळे, ज्योती अविनाश पाल, श्रीहरी खळकर, बेबीबाई खळकर, चैतन्य मेडीवर, तानिया मेडीवर, वैशाली माडेवार, रूपाली खणके, ललिता खणके, ऋषभ खडके, सचिन वाळके, जयश्री वरभे, सचिन वरदे, जयश्री खाणके, रत्नाकर राऊत, पार्थ राऊत, मंगला कळसकर, भूषण दुरकीवार, चालक रोहित देशमुख, वाहक संदीप पवार, विकी शेंडे, तारा साबळे, श्वेता स्वप्नील नवघरे, डॉ. गणेश जैन, सुमन कत्तलवार, व्यंकट ढगे, अश्विनी तोरपे, किशोर गावतुरे आणि गौरव कुमरे यांच्यासह अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे तसेच माजी खासदार व भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी तात्काळ सामान्य रुग्णालयात धाव घेत जखमींची विचारपूस केली. त्यांनी डॉक्टरांकडून उपचारांची माहिती घेत गंभीर जखमींना आवश्यक असल्यास नागपूर येथे हलविण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक रुग्णाला तातडीने योग्य उपचार मिळावेत, असे निर्देशही त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी आमदार डॉ. नरोटे आणि डॉ. अशोक नेते यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत ग्रामीण भागातील बससेवा अधिक सुरक्षित करण्याची गरज व्यक्त केली. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी बसेसची नियमित तांत्रिक तपासणी, चालकांचे योग्य प्रशिक्षण आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्थेवर भर देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. तसेच अपघाताची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.

या प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, डॉ. मनीष मेश्राम, डॉ. धुर्वे, डॉ. निलकमल मेश्राम तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षेकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker