ताज्या घडामोडीदेश विदेश

माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; जंगलात पुरून ठेवलेले साहित्य गडचिरोली पोलिसांकडून नष्ट

गडचिरोली, प्रतिनिधी :-

आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करत माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त केला. जंगल परिसरात जमिनीत पुरून ठेवलेले विविध साहित्य शोधून घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.

माओवादी संघटनांकडून शासनविरोधी घातपाताच्या कारवायांसाठी विविध प्रकारची शस्त्रे व स्फोटक साहित्य जंगल परिसरात गुप्तपणे लपवून ठेवण्यात येत असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. निवडणुका, नक्षल सप्ताह आदी काळात सुरक्षा दलांवर हल्ले करण्यासाठी या साहित्याचा वापर केला जात असल्याचेही उघड झाले आहे.

‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ अंतर्गत १६ मे २०२६ रोजी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांची चौकशी करण्यात आली. यावेळी पोलीस मदत केंद्र बिनागुंडा हद्दीतील जंगल परिसरात माओवाद्यांनी शस्त्रनिर्मिती व इतर साहित्य लपवून ठेवल्याची माहिती समोर आली.

या माहितीच्या आधारे २१ मे रोजी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक, प्राणहिता पथकाच्या संयुक्त सहा तुकड्या तसेच बीडीडीएसच्या दोन पथकांना शोध मोहिमेसाठी रवाना करण्यात आले.

२२ मे रोजी बिनागुंडा परिसरातील जंगलात घेरा घालून कसून तपासणी केली असता, पोलिसांना एक लेथ मशीन, बीजीएल पाईप्स, १२ बोअर पाईप, इन्व्हर्टर, जनरेटर, बॅटरी, ग्राइंडिंग व ड्रिलिंग मशीन, जिग सॉ मशीन, प्रेशर पंप, सोलर पॅनल, २० फुटांचा फुटबॉल पाईप आदी साहित्य आढळून आले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळीच हे सर्व साहित्य जवानांच्या मदतीने नष्ट करण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज तसेच पोलीस उपअधीक्षक विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक, प्राणहिता आणि बीडीडीएसच्या जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली. या कारवाईतील जवानांचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी विशेष कौतुक केले आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker