आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीय
विश्वजीत कोवासे यांचा पदग्रहण सोहळा २६ मे रोजी
काँग्रेसचा भव्य शेतकरी मेळावा

गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अॅड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांच्या पदग्रहण व सत्कार सोहळ्याचे तसेच भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन मंगळवार, २६ मे २०२६ रोजी दुपारी ४ वाजता धानोरा रोडवरील सुरेश सावकार पोरेड्डीवार यांच्या घरासमोरील प्रांगणात करण्यात आले आहे.
विश्वजीत कोवासे यांची दिल्ली येथून जिल्हाध्यक्षपदी निवड होताच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
माजी मंत्री तथा माजी खासदार मारोतराव कोवासे यांनी गेल्या चार दशकांहून अधिक काळ काँग्रेसमध्ये निष्ठावान नेते म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या राजकीय वारशाचा लाभ विश्वजीत कोवासे यांना मिळाला असून, मागील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळूनही त्यांनी पक्षनिष्ठा जपत अधिकृत उमेदवाराचा प्रचार केला होता.
युवक काँग्रेसच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर काम करत विविध राज्यांतील निवडणुकांमध्ये पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत काँग्रेस नेतृत्वाने त्यांच्याकडे गडचिरोली जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.
दरम्यान, त्यांच्या नियुक्तीनंतर काही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत विरोध सुरू केला असून काही तालुकाध्यक्षांनी राजीनाम्याची भूमिका घेतल्याची चर्चा आहे. मात्र, पक्षाच्या नियमानुसार नवीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती होताच जुन्या पदाधिकाऱ्यांची पदे आपोआप रद्द होतात. त्यामुळे आता विश्वजीत कोवासे यांच्यासमोर नवीन टीम उभारून जिल्ह्यात काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचे आव्हान असणार आहे.
जिल्ह्यात वाढत असलेल्या औद्योगिक प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्याची संधी कोवासे यांच्यासमोर असल्याचे बोलले जात आहे.



