आपला जिल्हाताज्या घडामोडी
“गोंडवाना विद्यापीठ इव्हेंटबाजीचे केंद्र नव्हे; शिक्षणाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्या” — आमदार डॉ. नरोटे

गडचिरोली, प्रतिनिधी :-
जिल्ह्याच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित असलेल्या गोंडवाना विद्यापीठातील प्रशासकीय सुस्ती, रखडलेले प्रकल्प आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरले.
आज गोंडवाना विद्यापीठाला भेट देत त्यांनी प्रभारी कुलगुरू श्रीराम कावळे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. विद्यापीठाच्या नवीन प्रस्तावित कॅम्पसचे बांधकाम निधी उपलब्ध असूनही रखडले कसे, तसेच महत्त्वाचे प्रस्ताव प्रशासकीय दिरंगाईमुळे प्रलंबित का आहेत, याबाबत त्यांनी प्रशासनाला जाब विचारला.
जिल्ह्यातील आदिवासी व गरजू विद्यार्थ्यांच्या हक्काचा पैसा आणि वेळ वाया जाणार असेल तर ते कदापि सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा यावेळी आमदार डॉ. नरोटे यांनी दिला.
PM-USHA सारख्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करत त्यांनी विद्यापीठातील कार्यक्रमांमध्ये नियोजनाचा अभाव असल्याचे निदर्शनास आणून दिले.
“गोंडवाना विद्यापीठ हे केवळ इव्हेंटबाजीचे केंद्र नसून शैक्षणिक शिस्त आणि गुणवत्तेचे केंद्र असले पाहिजे,” असे ठणकावत त्यांनी केवळ पदव्या वाटण्यापुरते मर्यादित न राहता शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी तात्काळ ठोस पावले उचलण्याची मागणी केली.



