ताज्या घडामोडीदेश विदेश

गडचिरोलीत आदिवासी मंत्र्यांच्या ताफ्यासमोर शिवसेनेची घोषणाबाजी

जपतलाई आश्रमशाळा प्रकरणाचा निषेध; पोलिसांच्या कडक बंदोबस्तात मंत्र्यांचा ताफा रवाना

गडचिरोली, प्रतिनिधी :-

जपतलाई आश्रमशाळेतील तीन आदिवासी विद्यार्थिनींच्या सर्पदंशाने झालेल्या मृत्यूच्या घटनेचा निषेध करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या ताफ्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकारामुळे सर्किट हाऊस परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आश्रमशाळेत १० ऑगस्टच्या मध्यरात्री मन्यार जातीच्या विषारी सापाने दंश केल्याने तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा, आरोग्य सुविधा आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित आश्रमशाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या कारवाईनंतरही जपतलाई प्रकरणावरून राजकीय वातावरण शांत झालेले नसल्याचे बुधवारी दिसून आले.

आदिवासी विकास मंत्री अशोक उईके गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांनी मंत्र्यांची भेट घेण्यास नकार दिल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मंत्री सर्किट हाऊसमधून बाहेर पडत असताना शिवसेना कार्यकर्त्यांनी जपतलाई प्रकरणाचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली.

घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सर्किट हाऊस परिसरात कडक बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे काही काळ निर्माण झालेल्या गोंधळानंतर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा ताफा सुरक्षितपणे रवाना झाल्याची माहिती आहे.

जपतलाई घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना न्याय, आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी पुढे येत असून, या प्रकरणावरून प्रशासनावर राजकीय दबाव वाढण्याची शक्यता आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker