पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे पुलावरून पाणी वाहत असल्याने भामरागड–आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या गंभीर परिस्थितीत भामरागड येथील दोन गंभीर रुग्णांना उपचारासाठी हलविण्याचे आव्हान निर्माण झाले होते. मात्र राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) पथकाने तातडीने मदतकार्य हाती घेत दोन्ही रुग्णांना सुरक्षितपणे नदीपलीकडे पोहोचविले.
एसडीआरएफच्या जवानांनी बोटीच्या साहाय्याने पर्लकोटा नदी पार करून दोन्ही रुग्णांना हेमलकसा येथे सुरक्षित पोहोचविले. त्यानंतर हेमलकसा येथून रुग्णवाहिकेद्वारे त्यांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले.
६३ गावांचा संपर्क तुटला
पर्लकोटा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पुलावरून पाणी वाहत आहे. परिणामी भामरागड–आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद झाली असून भामरागड तालुक्यातील तब्बल ६३ गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे नागरिकांना दळणवळणासह आरोग्यविषयक समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे.
पहा व्हिडीओ…
अशा प्रतिकूल परिस्थितीत गंभीर रुग्णांना वेळेत उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे होते. एसडीआरएफच्या पथकाने जोखीम पत्करून दोन्ही रुग्णांना नदीपलीकडे सुरक्षित पोहोचविल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात रवाना करणे शक्य झाले.
पुराच्या काळात भामरागड तालुक्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना सुरू असून, संपर्क तुटलेल्या गावांतील नागरिकांच्या आरोग्य व जीवनावश्यक गरजांकडे विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.