गडचिरोली, प्रतिनिधी :-
यंदा पावसाचे असमान वितरण आणि अनियमिततेमुळे जिल्ह्यातील अनेक भागांतील शेतकरी संकटात सापडले आहेत. काही भागांत अतिवृष्टी, तर काही भागांत पावसाअभावी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे केवळ दोन तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्याऐवजी संपूर्ण गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाध्यक्ष पवन राघोजी गेडाम यांनी केली आहे.
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पावसाचे प्रमाण व वितरण असमान राहिल्याने खरीप पिकांवर त्याचा परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत केवळ दोन तालुक्यांचा दुष्काळग्रस्त म्हणून विचार करून उर्वरित तालुक्यांतील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणे योग्य नसल्याचे गेडाम यांनी म्हटले आहे.
“दोन तालुके दुष्काळग्रस्त घोषित करून काय साध्य झाले? जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील शेतकरीही संकटात आहेत. शासनाने संपूर्ण जिल्ह्याचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा,” अशी मागणी पवन राघोजी गेडाम यांनी केली.
दुष्काळग्रस्त घोषित केल्यास पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या विविध मदतीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यामुळे शासनाने सर्व तालुक्यांचा तातडीने वस्तुनिष्ठ आढावा घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Back to top button