आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीय

राहुल गांधी डाव्या विचारसरणीचे : डॉ. अशोक नेते यांचा गंभीर आरोप

निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करून घटनात्मक संस्थांवरील जनतेचा विश्वास कमी करण्याचा प्रयत्न केल्याचा भाजपचा आरोप

गडचिरोली, प्रतिनिधी :-

निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली भारतीय जनता पार्टीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भूमिकेवर जोरदार टीका करत “राहुल गांधी हे डाव्या विचारसरणीचे आहेत”, असा गंभीर आरोप केला.

राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून निवडणूक प्रक्रिया तसेच घटनात्मक संस्थांबाबत प्रश्न उपस्थित केले जात असून, त्यातून जनतेमध्ये घटनात्मक संस्थांविषयी अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप डॉ. नेते यांनी केला. संविधानाच्या आधारावर देशातील लोकशाही व्यवस्था सुरू असताना घटनात्मक संस्थांवर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण करणे योग्य आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

पत्रकार परिषदेत SIR प्रक्रियेचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. पश्चिम बंगालमधील मतदारसंघांमध्ये SIR प्रक्रियेमुळे मतदारसंख्या कमी झाल्याचा दावा केला जात असल्याचा संदर्भ देत, संबंधित बाबींचा वस्तुनिष्ठ विचार करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले. मतदार याद्या अधिक अचूक व पारदर्शक करण्यासाठी आवश्यक प्रक्रियांमध्ये सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी, असेही मत मांडण्यात आले.

“व्होट चोरीचे आरोप करण्यापूर्वी आत्मपरीक्षण करावे”, अशी भूमिका मांडत निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेबाबत उपस्थित करण्यात येणाऱ्या आरोपांवरही डॉ. नेते यांनी भाष्य केले. कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशातील निवडणूक निकालांचा संदर्भ देत, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आरोप करताना सर्व बाबींचा विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकरराव येनगंधलवार, डॉ. प्रणय खुणे, सभापती अनिल कुणघाडकर, रमेश भुरसे, रामायण खटी आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker