
गडचिरोली, प्रतिनिधी :-
राष्ट्रभावना जागृत करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने गडचिरोली शहरात भव्य ‘तिरंगा पदयात्रा’ काढण्यात आली. हातात तिरंगा ध्वज घेतलेल्या नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी शहर दुमदुमून गेले.
या पदयात्रेत माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते आणि आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

पदयात्रेला आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या कर्तव्य कक्ष कार्यालयापासून सुरुवात झाली. चामोर्शी रोड, गांधी चौक, त्रिमूर्ती चौक आणि बाजार चौक मार्गे ही पदयात्रा कारगिल चौकात पोहोचली. येथे कारगिल युद्धातील हुतात्म्यांना अभिवादन करून पदयात्रेचा समारोप करण्यात आला.

यावेळी बोलताना डॉ. अशोक नेते यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि संरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या शौर्याचे स्मरण केले. कारगिल युद्धातील भारतीय सैनिकांच्या पराक्रमामुळे देशाचा गौरव वाढला असून, त्यांच्या बलिदानाची आठवण प्रत्येक नागरिकाच्या मनात कायम राहिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी राष्ट्रभावना जागृत करण्यासाठी तिरंगा पदयात्रेसारखे उपक्रम महत्त्वाचे असल्याचे सांगत देशाच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या सर्व शहीद जवानांना अभिवादन केले.
पदयात्रेदरम्यान देशभक्तीपर गीतांनी आणि घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. डौलाने फडकणाऱ्या तिरंग्यामुळे शहराला राष्ट्रभक्तीचे स्वरूप प्राप्त झाले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.
यावेळी माजी आमदार नामदेवराव उसेंडी, नगराध्यक्ष अॅड. प्रणोती सागर निंबोरकर, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, डॉ. प्रणय खुणे, रमेश भुरसे, अनिल कुनघाडकर, दतु सुत्रपवार, सिम्मा कन्नमवार, प्रमोद पिपरे, योगिता पिपरे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, वर्षा शेडमाके, अनिल पोहनकर, सुधाकर पेटकर, श्रीकांत पतरंगे, अविनाश विश्रोजवार, नरेश हजारे, किर्ती मासुरकर, लोमेश कोलते, साई सिल्लमवार यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button