गडचिरोली, प्रतिनिधी :-
एटापल्ली तालुक्यातील कोठी-कोरनार येथील सुमारे चार कोटी रुपये खर्चाच्या पुलाचा काही भाग २९ जुलै रोजी पुराच्या पाण्यामुळे कोसळल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करून दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई करावी, अशी मागणी आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी आज पत्रकार परिषद मधून केली आहे.
या पुलाचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १५ ऑगस्ट २०२३ रोजी झाले होते. अवघ्या तीन वर्षांच्या आत पूल कोसळल्याने बांधकामाचा दर्जा, पुलाची रचना, पाया तसेच कामाच्या देखरेखीबाबत सखोल चौकशी आवश्यक असल्याचे बन्सोड यांनी म्हटले आहे.
डिझाइन बदलाचीही चौकशी करा
पुलाच्या मंजूर डिझाइनमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती समोर येत असल्याचा दावा आजाद समाज पार्टीने केला आहे. मूळ मंजूर डिझाइन, त्यातील बदल, सुधारित अंदाजपत्रक, तांत्रिक मंजुरी तसेच प्रत्यक्ष बांधकाम यांची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पुलाच्या पायाची खोली, नदीचा प्रवाह, पुराची पातळी, पाया बांधण्यासाठी करण्यात आलेले तांत्रिक परीक्षण, काँक्रीट व स्टीलच्या गुणवत्ता चाचण्या, मोजमाप पुस्तिका आणि गुणवत्ता नियंत्रण अहवाल यांचीही स्वतंत्र तज्ज्ञांकडून तपासणी करावी, अशी मागणी बन्सोड यांनी केली.
दरम्यान, पुलाच्या कामाची मूळ मंजूर किंमत, डिझाइनमधील बदलानंतर झालेला प्रत्यक्ष खर्च आणि वाढीव निधीबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या आर्थिक बाबींचे विशेष लेखापरीक्षण करण्याची मागणी पक्षाने केली आहे.
‘दोषींवर कारवाई का नाही?’
गडचिरोलीतील एका आश्रमशाळेतील दुर्घटनेनंतर संबंधित संस्थेवर तातडीने कारवाई झाली. मग जनतेच्या पैशातून उभारलेला आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेला पूल तीन वर्षांत कोसळल्यानंतर संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई का झाली नाही, असा सवाल बन्सोड यांनी उपस्थित केला.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यांच्या कार्यकाळातील कामांचीही चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या कार्यकाळातील प्रमुख रस्ते व पुलांच्या कामांचे स्वतंत्र गुणवत्ता परीक्षण आणि विशेष लेखापरीक्षण करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
१५ ऑगस्टपूर्वी कारवाईची मागणी
कोठी-कोरनार पुलाची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी जाहीर करून चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना पदावरून दूर करावे, तसेच दोषी कंत्राटदारावर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी आजाद समाज पार्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
१५ ऑगस्टपूर्वी ठोस कारवाई न झाल्यास आजाद समाज पार्टी, आदिवासी विकास परिषद, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि बिरसा ब्रिगेडच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा राज बन्सोड यांनी दिला आहे.
गडचिरोलीतील सार्वजनिक बांधकामांच्या गुणवत्तेबाबत यापूर्वीही तक्रारी झाल्याच्या पार्श्वभूमीवर कोठी-कोरनार पूल प्रकरणाची केवळ चौकशी न करता संबंधित सर्व कागदपत्रांची तांत्रिक व आर्थिक तपासणी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
गडचिरोलीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांबाबत यापूर्वीही तक्रारी व आरोप झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
पत्रकार परिषदेत आझाद पार्टीचे पदाधिकारी विनोद मडावी, शेखर काटेगे, किसन उसेंडी, डॉ. प्रशांत, हंसराज उराडे, नागसेन खोब्रागडे, वनिता उसेंडी आदी उपस्थित होते.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button