ताज्या घडामोडीमहाराष्ट्रशिक्षण

संचमान्यतेसाठी विद्यार्थी माहिती अचूक भरण्याचे शिक्षण संचालनालयाचे निर्देश

३० सप्टेंबरच्या आधार वैध विद्यार्थी संख्येवर होणार सन २०२६-२७ ची ऑनलाइन संचमान्यता; माहितीतील त्रुटी अथवा विलंबाची जबाबदारी संबंधितांवर

गडचिरोली,प्रतिनिधी :-

राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन २०२६-२७ ची ऑनलाइन संचमान्यता ३० सप्टेंबर २०२६ रोजी नोंद असलेल्या व आधार वैध विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्यात येणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयाने सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तसेच शिक्षण निरीक्षकांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

संचमान्यतेसाठी विद्यार्थी माहिती भरताना Division Aid, Medium, Stream, Inactive Division व Pen Null या बाबी अचूक असणे आवश्यक असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. या माहितीमध्ये त्रुटी राहिल्यास संबंधित शाळेची संचमान्यता तयार होण्यात अडचण येऊ शकते किंवा योग्य माहिती असलेल्या विद्यार्थ्यांनाच ग्राह्य धरून संचमान्यता तयार केली जाऊ शकते.

शाळांच्या संचमान्यतेची प्रक्रिया ऑक्टोबर २०२६च्या पहिल्या आठवड्यात पूर्ण करण्याचे नियोजन असल्याने, ३० सप्टेंबरपूर्वी वरील सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करण्याच्या सूचना शाळा स्तरावर देण्यात आल्या आहेत. तसेच १ ऑक्टोबर २०२६ रोजी शाळा स्तरावरील विद्यार्थी माहिती वर्ग करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुदतवाढ नाही; विलंबाची जबाबदारी निश्चित होणार

संचालकांच्या पत्रात या प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित स्तरावरून माहिती सादर करण्यास विलंब झाल्यामुळे संचमान्यता तयार झाली नाही, तर त्या विलंबासाठी संबंधित स्तराची जबाबदारी निश्चित करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

यासाठी गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख आणि सर्व संबंधित मुख्याध्यापकांना तात्काळ निर्देश देण्यासही शिक्षण विभागाला सांगण्यात आले आहे.

सदर पत्रावर डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांची डिजिटल स्वाक्षरी असून पत्राची तारीख २४ सप्टेंबर २०२६ आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker