आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अखेर शिक्षकेतर पदभरतीचा मार्ग मोकळा!

कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहाय्यकांची पदे भरण्यास शासनाची मंजुरी

पुणे, प्रतिनिधी :-

महाराष्ट्रातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिक्षकेतर पदभरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून, शासनाने ११ ऑगस्ट २०२६ रोजी यासंदर्भात शासन निर्णय (GR) जारी केला आहे. या निर्णयामुळे शाळांमधील रिक्त शिक्षकेतर पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग खुला झाला आहे.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर संघटनांचे महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. विविध बैठका, निवेदने आणि शासनासोबतच्या पत्रव्यवहारातून त्यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सातत्याने मांडल्या.

५ ऑगस्टच्या बैठकीनंतर निर्णयाला गती

दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रधान सचिवांसोबत झालेल्या बैठकीत शिक्षकेतर पदभरतीचा प्रश्न प्राधान्याने मांडण्यात आला. शिक्षक भरतीप्रमाणेच अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या शिक्षकेतर पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले होते.

या पाठपुराव्यानंतर अवघ्या काही दिवसांत, ११ ऑगस्ट रोजी शासन निर्णय निर्गमित झाल्याने शिक्षकेतर पदभरतीला अधिकृत मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात आले आहे.

कनिष्ठ लिपिकांसह विविध पदांचा समावेश

शासनाच्या या निर्णयामुळे कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक या संवर्गातील रिक्त पदे नियमानुसार भरण्याचा मार्ग खुला झाला आहे. त्यामुळे राज्यातील शाळांमध्ये अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या पदांवर भरती होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.

या निर्णयामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तसेच शैक्षणिक क्षेत्रात नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. शाळांमधील प्रशासकीय तसेच शैक्षणिक पूरक कामकाजासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध होण्यासही यामुळे मदत होणार आहे.

‘हा एकजुटीच्या संघर्षाचा विजय’

शिक्षकेतर पदभरतीला मिळालेली मंजुरी हा केवळ एका व्यक्तीचा किंवा एका संघटनेचा विजय नसून, महाराष्ट्रातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचा आणि सातत्यपूर्ण संघर्षाचा विजय आहे, अशी भावना शिक्षकेतर कर्मचारी वर्गातून व्यक्त होत आहे.

या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर संघटनांचे महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांचे राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनींच्या वतीने अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

“संघर्ष सुरू ठेवला तर यश निश्चित मिळते; एकजूट जिंकली, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा लढा जिंकला,” अशी प्रतिक्रिया शिक्षकेतर कर्मचारी वर्गातून व्यक्त होत आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker