ताज्या घडामोडी

आश्रमशाळांमध्ये सुविधांचा अभाव; आदिवासी विकास मंत्र्यांनी राजीनामा द्यावा

अप्पर आयुक्त, प्रकल्प अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची शेकापची मागणी

गडचिरोली, प्रतिनिधी :-

जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचा आरोप करत आदिवासी विकास विभागाच्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, तसेच अप्पर आयुक्त आणि प्रकल्प अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके-विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते यांनी केली आहे.

जपतलाई येथील आश्रमशाळेतील सर्पदंशाच्या घटनेनंतर शेकापच्या वतीने जिल्ह्यातील काही आश्रमशाळांना प्रत्यक्ष भेटी देण्यात आल्या. यावेळी अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी बेड उपलब्ध नसल्याचे, विद्यार्थी जमिनीवर गाद्या टाकून झोपत असल्याचे, तसेच फाटलेल्या व अस्वच्छ गाद्या, बेडशीट आणि चादरी असल्याचे आढळून आल्याचा दावा जराते यांनी केला.

भामरागड प्रकल्पांतर्गत एकाही आश्रमशाळेला अद्याप बेडचा पुरवठा झालेला नसल्याचा आरोपही त्यांनी केला. अनेक शाळांमध्ये गरम पाण्याची सुविधा बंद आहे, भोजनासाठी पुरेशी व्यवस्था नाही, कर्मचारी संख्या अपुरी आहे, तर काही ठिकाणी महिला अधीक्षक वगळता महिला कर्मचारी, इतकेच नव्हे तर महिला शिक्षिकाही उपलब्ध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आश्रमशाळा सुरू होऊन दोन महिने उलटूनही काही ठिकाणी स्वयंपाकासाठी गॅस उपलब्ध नसल्याचा, तसेच मच्छरदाण्यांचा तुटवडा असल्याचा आरोप करण्यात आला. बेडच नसल्याने मच्छरदाण्यांचा वापरही करता येत नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असल्याचे जराते यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

जपतलाई येथील शाळेत विद्यार्थ्यांसाठी बेडची व्यवस्था नसेल, तर संबंधित शाळेला वर्षानुवर्षे अनुदान कसे देण्यात आले, असा सवाल जराते यांनी उपस्थित केला. आश्रमशाळांमधील सुविधांची नियमित तपासणी झाली का, संबंधित अधिकाऱ्यांनी संस्थांना जाब विचारला का, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

आदिवासी विकास विभागाचा मोठा अर्थसंकल्प असतानाही विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसतील तर निधीच्या वापराबाबतही प्रश्न उपस्थित होतात. या संपूर्ण व्यवस्थेची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेकापने केली आहे.

मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

आदिवासी विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात विभाग अपयशी ठरल्याचा आरोप करत आदिवासी विकास विभागाच्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. राजीनामा न दिल्यास मुंबईतील मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा भाई रामदास जराते यांनी दिला.

जपतलाई आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेताना राजकीय द्वेष न ठेवता जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांच्या सुविधांची समान पद्धतीने तपासणी करावी. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात राजकारण न आणता आश्रमशाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही त्यांनी केली.

यावेळी भाई शामसुंदर उराडे, डॉ. गुरुदास सेमस्कर, जयश्रीताई वेळदा, अक्षय कोसनकर, रमेश चौखुंडे, प्रभाकर गव्हारे, डंबाजी भोयर, दामोदर रोहणकर, अशोक किरंगे, पांडुरंग गव्हारे, तुळशिदास भैसारे, राजू केळझरकर, चिरंजीव पेंदाम, चंद्रकांत भोयर, योगेश चापले, कविता ठाकरे, सोनाली कवडो, रोहिणी उईके, कविता मेश्राम, संगिता चांदेकर आदी उपस्थित होते.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker