तळोधी मोकासा, प्रतिनिधी :-
गणेशोत्सव म्हटला की धार्मिक वातावरण आणि सांस्कृतिक कार्यक्रम डोळ्यासमोर येतात. मात्र तळोधी मोकासा येथील श्री राम बाल गणेश मंडळाने ५७व्या गणेशोत्सवाला सामाजिक सेवेची जोड देत आरोग्य व जनसेवेचा वेगळा आदर्श निर्माण केला. राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय संस्था, गडचिरोली यांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दि. १९ सप्टेंबर रोजी आयोजित आरोग्य शिबिरात तब्बल ४५० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये NCD Screening, Sickle Cell, हिमोग्लोबिन, RDK, रक्तातील साखर, कुष्ठरोग व क्षयरोग तपासणी करण्यात आली. नागरिकांना ABHA कार्ड व आयुष्मान कार्ड काढण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. पुढील उपचाराची आवश्यकता असलेल्या १५ रुग्णांना उपचारासाठी संदर्भित करण्यात आले.
यानंतर दि. २१ सप्टेंबर रोजी आयोजित जनसेवा शिबिरात आयुष्मान भारत कार्ड, NCMC तसेच e-Shivneri सेवांबाबत नागरिकांना मार्गदर्शन व आवश्यक सुविधा देण्यात आल्या. आरोग्यसेवेसोबत शासकीय योजनांची माहिती आणि सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने ग्रामीण नागरिकांना त्याचा थेट फायदा झाला.
मान्यवरांच्या भेटींनी उत्सवाला रंग
गणेशोत्सवाच्या कालावधीत सिनेट सदस्य तनुश्री ताई आत्राम यांनी तसेच गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद रामजी नरोटे व त्यांच्या पत्नी वैशाली ताई नरोटे यांनी मंडळाला सदिच्छा भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले व आरती केली. यावेळी मंडळाच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
‘उत्सवातून सेवा’चा संदेश
धार्मिक परंपरेसोबत सामाजिक उपक्रम राबवित मंडळाने ‘उत्सवातून सेवा आणि सेवेतून समाजहित’ हा संदेश दिला. या उपक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष संदेश झाडे, उपाध्यक्ष अमर आदे, सचिव रॉयल कुणघाडकर, सहसचिव शैलेश बावणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अभिलाष दशरथ कुणघाडकर यांनी आरोग्य, जनसेवा आणि शासकीय सुविधांचे उपक्रम गावात राबविण्यासाठी विशेष पुढाकार घेतला. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव धार्मिक उत्सवासोबतच सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरला.
Back to top button