गडचिरोली, प्रतिनिधी :-
आजाद समाज पक्ष, गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन कात्रटवार सभागृह, चामोर्शी रोड, गडचिरोली येथे करण्यात आले. आगामी काळातील पक्षाची संघटनात्मक बांधणी, ग्रामपातळीवरील जनतेच्या प्रश्नांवर लढा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश सचिव दिगंबर पलटणकर होते. महाराष्ट्र प्रदेश युवा महासचिव संदीपदादा मोरे व विदर्भ सचिव धर्मानंद मेश्राम यांच्या हस्ते उद्घाटन झाले. जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, जिल्हा प्रभारी विनोद मडावी, ॲड. कैलास जाधव, देवाभाऊ साळवे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रशांत सातार, चेतन काटेंगे, जिल्हा महासचिव अंकुश कोकोडे, जिल्हा संघटक हंसराज उराडे, जिल्हा सचिव प्रकाश बन्सोड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष विवेक खोब्रागडे होते.
शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी
भारत कृषिप्रधान देश असूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा मुद्दा संमेलनात मांडण्यात आला. कर्जबाजारीपणा, उत्पादन खर्च, बाजारभाव, सिंचन, पीकविमा आणि नैसर्गिक आपत्ती यांसारख्या प्रश्नांना विधिमंडळात अधिक संघटित प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी पदवीधर मतदारसंघाच्या धर्तीवर स्वतंत्र ‘शेतकरी मतदारसंघ’ निर्माण करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
नोंदणीकृत शेतकरी आयडीधारकांना मतदानाचा अधिकार देऊन शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारा आमदार निवडण्याची व्यवस्था निर्माण करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. हा ठराव पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई चंद्रशेखर आजाद यांच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला.
गावागावात ‘प्रतिसरपंच’; पहिल्या टप्प्यात ३५ नियुक्त्या
ग्रामपातळीवरील नागरिकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविणे तसेच ग्रामविकासातील अनियमितता व भ्रष्टाचाराच्या प्रश्नांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘प्रतिसरपंच’ उपक्रम राबविण्यात येत असल्याचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड व जिल्हा प्रभारी विनोद मडावी यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात ३५ ग्रामपंचायतींसाठी प्रतिसरपंच नियुक्त करण्यात आले. यामध्ये वाकडी येथील विजय देवतळे, मार्कंडा येथील रत्ना सरपे, येडानूर येथील नितेश पोटावी, विहीरगाव येथील मुकेश सहारे, मालेवाडा येथील संतोष मोहुर्ले, बांधगाव येथील भास्कर वट्टी यांच्यासह विविध गावांतील कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
आरोग्य व शिक्षणासाठी स्वतंत्र हेल्पलाईन
गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी आजाद समाज पक्षाच्या वतीने स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. हेल्पलाईन क्रमांक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
शासकीय रुग्णालयातील समस्या, उपचारातील अडचणी, आरोग्यसेवेतील त्रुटी, शाळा व शिक्षकांशी संबंधित प्रश्न, विद्यार्थ्यांच्या अडचणी तसेच शिक्षण विभागाशी संबंधित तक्रारींसाठी या हेल्पलाईनचा उपयोग केला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सतीश कुसराम कार्याध्यक्ष, तुषार रामटेके जिल्हा प्रवक्ते
संघटनात्मक विस्ताराला गती देण्यासाठी विविध पदांवर नवीन नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामध्ये सतीश कुसराम – जिल्हा कार्याध्यक्ष, तुषार रामटेके – जिल्हा प्रवक्ते, मारोती येलावार – चामोर्शी तालुकाध्यक्ष, सुरेश पवार – चामोर्शी तालुका उपाध्यक्ष, आकाश दुर्गे – चामोर्शी तालुका सचिव, पितांबर हर्रो – कुरखेडा तालुका उपाध्यक्ष, नितेश गुरुनुले – मालेवाडा क्षेत्र प्रमुख, रंजित बांबोळे – धानोरा तालुका कार्याध्यक्ष आणि उमेश तिम्मा – एटापल्ली तालुकाध्यक्ष यांचा समावेश आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी
आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी पक्षाची संघटनात्मक बांधणी सुरू असल्याचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी सांगितले. प्रत्येक गावात संघटना मजबूत करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. आगामी निवडणुकांमध्ये तरुण कार्यकर्त्यांना उमेदवारीत प्राधान्य देण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा प्रभारी विनोद मडावी यांनी पक्षाची आगामी कार्यपद्धती, संघटन विस्तार आणि जनतेच्या प्रश्नांवर आंदोलनात्मक भूमिका घेण्याबाबत मार्गदर्शन केले.
शासकीय सेवेत निवड झालेल्या सहकाऱ्यांचा सत्कार
आजाद समाज पक्षाचे सहकारी प्रितेश अंबादे, नयना बन्सोड आणि शुभम पाटील यांची शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल, तसेच पक्षाच्या माजी जिल्हाध्यक्षा सोनाशी डांगे यांची आरोग्य विभागात शासकीय सेवेत नियुक्ती झाल्याबद्दल शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, गडचिरोली विधानसभा प्रमुख धनराज दामले, धानोरा तालुकाध्यक्ष किशोर उसेंडी, गडचिरोली तालुकाध्यक्ष प्रेम मडावी, कुरखेडा तालुकाध्यक्ष सावन चिकराम, भामरागड तालुकाध्यक्ष महेंद्र उसेंडी, महिला आघाडीच्या तारका भडके, शोभा खोब्रागडे, वनिता उसेंडी, सतीश दुर्गमवार, नितेश वेस्कडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Back to top button