गडचिरोली, प्रतिनिधी :-
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘दारू आणि ड्रग्जपासून स्वातंत्र्य’ हा संदेश देण्यासाठी ‘निर्माण’ आणि ‘मुक्तिपथ’ यांच्या वतीने गुरुवारी गडचिरोली शहरात व्यसनविरोधी रॅली काढण्यात आली. रॅलीत ४०० हून अधिक युवक-युवती सहभागी झाले. विविध घोषणांमधून युवकांनी व्यसनमुक्त गडचिरोलीचा संदेश दिला.
गडचिरोली नगरपरिषद येथून रॅलीला सुरुवात झाली. ‘सर्च’चे सहसंचालक तुषार खोरगडे आणि ‘मुक्तिपथ’चे सहसंचालक संतोष सावळकर यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन झाले. ‘दारू, ड्रग्ज को दफा करो’, ‘युवाशक्ती को रिहा करो’, ‘नो ड्रग्ज-नो दारू’, ‘जे दारूत रंगले, त्यांचे करिअर भंगले’, ‘विचार करा पक्का, दारूला मारा धक्का’ अशा घोषणांनी शहर परिसर दुमदुमून गेला.
नगरपरिषद चौक, एस मार्ट, गांधी चौक, जिल्हा परिषद शाळा, पोलीस स्टेशन आणि एआरबी बसस्थानक मार्गे रॅली काढण्यात आली. सहभागी युवकांच्या हातातील व्यसनविरोधी संदेश देणारे फलक लक्षवेधी ठरले. नगरपरिषद चौकात रॅलीचा समारोप झाला. यावेळी ‘निर्माण’च्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश देणारे नुक्कड नाटक सादर केले.
समारोपप्रसंगी पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कुटुंबातील व्यक्ती व्यसनाच्या आहारी गेल्यास त्यांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. मुलींना कोणी त्रास देत असल्यास शिक्षक किंवा पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
‘निर्माण’चे संचालक अमृत बंग यांनी गडचिरोलीतील दारूबंदीच्या इतिहासाचा उल्लेख करत, दारू आणि ड्रग्जपासून युवकांना दूर ठेवणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. तरुणांचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी व्यसनमुक्त गडचिरोलीसाठी प्रयत्न आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या रॅलीत गोंडवाना विद्यापीठातील एनएसएस विद्यार्थी, शिवकृपा महाविद्यालय, जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, वसंत विद्यालय, शासकीय नर्सिंग कॉलेज, शिवाजी महाविद्यालय, फुले-आंबेडकर महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले.
विविध संस्थांचा पाठिंबा
रॅलीला अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, गडचिरोली डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, गडचिरोली व्यापारी संघटना, चालक-मालक संघटना, गोंडवाना विद्यापीठ, अधिवक्ता संघटना आणि फळविक्रेता संघटनेसह विविध संस्थांनी पाठिंबा दिला.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button