गडचिरोली,प्रतिनिधी :-
शहरातील मुख्य केंद्रबिंदू असलेल्या कारगील चौकात काल रात्री ११:४५ च्या सुमारास एका भरधाव कारचा भीषण अपघात झाला. नियंत्रण सुटल्याने झालेल्या या अपघातात कार चक्क हवेत उसळून कारगील स्मारकाजवळ पालथी पडली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपघाताची भीषणता: १०० फूट हवेत उसळली कार:-
मिळालेल्या माहितीनुसार,देव राहुल महात्मे (२२) नावाचा युवक आपली कार घेऊन चंद्रपूर मार्गावरून शहराकडे येत होता. कारचा वेग इतका प्रचंड होता की, चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या डाव्या बाजूचे कठडे तोडून दोन लोखंडी दिशादर्शक फलकांना धडकली. या धडकेनंतर कार जवळपास १०० फूट अंतरावर हवेत उसळून कारगील स्मारकाजवळ रस्त्याच्या मध्यभागी उलटली.
नागरिकांची सतर्कता आणि नशिबाची साथ:-
अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कार पूर्णपणे उलटलेली असतानाही नागरिकांनी हिंमत दाखवून जखमी चालकाला बाहेर काढले. सुदैवाने कारमध्ये चालक एकटाच होता आणि आज रामनवमी असल्त्याने या वेळेस रस्त्यावर नागरिक शतपावली करत नसल्याने मोठा अनर्थ टळला.
एका महिन्यात दुसरी घटना:-
कारगील चौकात गेल्या एका महिन्यात झालेली ही दुसरी मोठी अपघाताची घटना आहे, ज्यामुळे परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी तातडीने पथक रवाना केले. जखमी युवकाला रुग्णवाहिकेने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.