आपला जिल्हा

आदिवासी समाजाने पंचसुत्री स्वीकारून परिवर्तन घडवावे

माजी आमदार डॉ. देवराव होळी यांचे आवाहन

गडचिरोली,प्रतिनिधी :-

“अविकासाच्या गर्तेत सापडलेल्या आदिवासी समाजाने समाजहिताच्या पंचसुत्रांचा स्वीकार करून एक नवसंस्कृती उभारली पाहिजे,” असे मत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नई दिल्लीचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

जागतिक आदिवासी दिनी ‘पंच परिवर्तन सूत्र’ राबवणार

डॉ. होळी म्हणाले की, येत्या ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त गडचिरोली जिल्ह्यात ‘पंच परिवर्तन सूत्र’ राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित केला आहे. मात्र, उत्सव साजरा करण्यापलीकडे जाऊन समाजाला दिशा देणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आजची स्थिती चिंताजनक

“आजही आदिवासी समाज भरकटलेला आहे. अनेक समाजसुधारकांचे प्रयत्न झाले तरीही समाजात अपेक्षित बदल घडलेले नाहीत. अंधश्रद्धा, चुकीच्या चालीरीती, अशिक्षितपणा आणि संघटनेचा अभाव यामुळे समाज मागे पडतो आहे,” असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

पंच परिवर्तन सूत्रे पुढीलप्रमाणे:

1. कुटुंब प्रबोधन – सक्षम व शाश्वत कुटुंबव्यवस्था निर्माण करणे.

2. पर्यावरण संवर्धन – वैयक्तिक व सामाजिक पातळीवर पर्यावरणाचे रक्षण.

3. सामाजिक समरसता – भेदभाव नष्ट करून मैत्रीपूर्ण सामाजिक नातेसंबंध प्रस्थापित करणे.

4. नागरी कर्तव्य – देशभक्ती आणि नैतिक मूल्यांचा अंगीकार.

5. स्व-जागृती – आपली भाषा, संस्कृती, देश आणि परंपरांचे जतन व विकास.

“ही पंचसुत्रे नवीन नाहीत. आपल्या परंपरेचा आणि संस्कृतीचा भाग आहेत. परंतु त्याचे विस्मरण होत चालले आहे. त्यामुळे समाजाला योग्य दिशा देण्यासाठी ही सूत्रे पुनः अंगीकारणे गरजेचे आहे,” असे आवाहन त्यांनी केले.

या पत्रकार परिषदेला महिला जिल्हाध्यक्ष पुष्पलता कुमरे, युवा जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे, उपाध्यक्ष वामन जुनघरे, सूरज मडावी, मुक्ता मेश्राम, विद्या दुग्गा, देवेंद्र राणे आदी मान्यवर उपस्थित होते.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker