आपला जिल्हाताज्या घडामोडी
भंडारा–गडचिरोली प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्गास प्रशासकीय मान्यता

गडचिरोली, प्रतिनिधी : –
भंडारा ते गडचिरोली दरम्यान प्रस्तावित प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्ग प्रकल्पास महाराष्ट्र शासन यांच्याकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मार्फत करण्यात येणार असून यासाठी सुमारे ९३१.१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
शासनाने जारी केलेल्या निर्णयानुसार भंडारा–गडचिरोली प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्गाच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत नागपूर–गोंदिया प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्गावरील सावरखेडा इंटरचेंजपासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील कोकरागडपर्यंत तसेच बोरगाव इंटरचेंजपासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३-डी वरील रर्मोचनपर्यंत महामार्ग उभारण्यात येणार आहे. या दोन्ही टप्प्यांची एकूण लांबी सुमारे ९४.२४१ किलोमीटर राहणार आहे.
या महामार्ग प्रकल्पासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया तातडीने राबविण्यासही मान्यता देण्यात आली असून जमीन संपादनासाठी ५३४.४६ कोटी रुपये मूळ रक्कम व ३९६.६९ कोटी रुपये संभाव्य व्याज अशी एकूण ९३१.१५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रकल्पासाठी आवश्यक आर्थिक नियोजन व निविदा प्रक्रिया पुढील टप्प्यात राबविण्यात येणार आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी निधी उभारणी करताना HUDCO कडून कर्ज घेण्यास शासनाने सहमती दर्शविली असून आवश्यक आर्थिक तूट राज्य शासनाकडून भरून काढण्याची तरतूद करण्यात आली आहे.
या महामार्गामुळे नागपूर, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांतील आदिवासी व दुर्गम भाग मुख्य प्रवाहाशी जोडले जाणार असून कृषी, खनिज, उद्योग व वाहतूक क्षेत्राला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तसेच स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची शक्यता आहे.
शासन निर्णय वाचा : –



