आपला जिल्हा
सिरोंचा तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद

गडचिरोली,प्रतिनिधी :-
सध्या मान्सून कालावधी सुरु असून मागील 5 दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यातील काही
भागात मुसळधार पाऊसासह अतिवृष्टी झालेली असून गोदावरी, प्राणहिता, बांडिया, पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती इ. नद्यांच्या पाण्याची पातळी ही वाढत असून सदर पाणलोट क्षेत्रातील नद्या व नाल्यांना पूर आल्याने बरेच अंतर्गत मार्ग बंद आहे. तसेच भारतीय हवामान विभागाचे प्रादेशिक कार्यालय, नागपूर व हैद्राबाद द्वारा दि. 27 जुलै 2023 द्वारे प्रसारित हवामान संदेशानुसार पुढील 24 तासाकरीता गडचिरेाली/चंद्रपूर जिल्हा व गडचिरोली जिल्ह्यातील प्राणहिता, गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रातील तेलंगाणा राज्यातील काही जिल्हृयांना रेट अलर्ट घोषित करुन मुसळधार पाऊसासह अत्याधिक पाऊसाची दाट शक्यता वर्तविली आहे.
पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकरीता संजय मीणा, जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 अंतर्गत पूरपरिस्थितीवर उचित प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील दिनांक 28 जुलै 2023 व 29 जुलै 2023 रोजी सर्व अंगणवाडी, शाळा, विद्यालये, महाविद्यालये बंद करण्याचे आदेश दिले आहे.



