आपला जिल्हा
गडचिरोली शहरातील नागरी सुविधांच्या विकासाला गती द्या – जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व आ. डॉ. मिलिंद नरोटे यांच्याकडून विकासकामांची पाहणी

गडचिरोली,प्रतिनिधी :-
शहराच्या विकासासाठी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी नगर परिषद गडचिरोली अंतर्गत सुरू असलेल्या महत्त्वाच्या विकासकामांची पाहणी केली. त्यांनी शहरातील नागरी सुविधांच्या विकासाला गती देण्याचे निर्देश दिले तसेच प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. भविष्यात अधिकाधिक विकासकामे हाती घेण्यासाठी नवीन प्रकल्पांचे सादरीकरण व प्रस्ताव सादर करण्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे, उप कार्यकारी अभियंता गणेश परदेशी, उप अभियंता अंकुश भालेराव आणि सुजित खमनकर आदी अधिकारी उपस्थित होते.

गोकुळ नगर येथील मामा तलावाच्या सुशोभीकरण आणि विकास प्रकल्पाची पाहणी जिल्हाधिकारी आणि आमदार नरोटे यांनी केली. तलावाच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी वॉकवे, बगीचा, प्रवेशद्वार, विश्रांती स्थळे आणि प्रकाशयोजना यांसारखी कामे सुरू आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या कामांची गती वाढवून ते निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. आ. नरोटे यांनी शहरातील नागरिकांसाठी योग्य पर्यटनस्थळे नसल्याचे सांगून हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले.




