गडचिरोली, प्रतिनिधी :
दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैध देशी दारू तयार करण्याचा आणि विक्रीचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांनी आणखी एक धडक कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुरुमगाव येथे बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना उघडकीस आणत एकूण ₹10.16 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली 3 नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे व्यंकटेश बैरमवार (रा. मुरुमगाव, ता. धानोरा) हा आपल्या घरी बनावट देशी दारू तयार करून “टाटा सुपर ए.सी.ई.” (MH-34-AV-2051) या वाहनातून वाहतूक करत असल्याचे समजले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुरुमगाव बाजार मंडी येथे सापळा रचला असता संबंधित वाहनातून देशी व विदेशी दारूचा मोठा साठा मिळून आला. तसेच जवळच असलेले “अशोक लेलँड दोस्त” (MH-33-T-2035) वाहन व आरोपीचे घर तपासल्यावर दारू तयार करण्यासाठी लागणारे रासायनिक द्रव्य, सिलींग मशीन, झाकणं, पाईप, पिशव्या इत्यादी साहित्य आढळले.
जप्त मुद्देमालात समाविष्ट :-
500 किलो स्पिरीट भरलेले 2 ड्रम (₹1,52,000)
बनावट व विदेशी दारूचे बॉक्स (₹1,42,000)
दोन चारचाकी वाहने (₹7,00,000)
दारू बनविण्याचे व पॅकिंग साहित्य (₹22,375)
एकूण किंमत ₹10,16,375 रुपये.
या प्रकरणी व्यंकटेश बैरवार याच्याविरुद्ध मुरुमगाव पोलीस ठाण्यात अपराध क्र. 38/2025 अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे. पुढील तपास पो.उप.नि. सचिन ठेंग हे करीत आहेत.
ही कारवाई पो.नि. अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सपो.नि. भगतसिंग दुलत, पो.ना. धनंजय चौधरी, पो.अं. राजु पंचफुलीवार, मपोशि वृषाली चव्हाण यांनी केली.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button