राजकीय
राजकीय भूकंप : या नेत्याने दिली भाजपला सोडचिठ्ठी; केली ‘घरवापसी’

गडचिरोली, प्रतिनिधी :-
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर गडचिरोली, विशेषतः अहेरी तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार यांनी भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का देत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) अधिकृतपणे प्रवेश केला. आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
ओल्लालवार यांनी यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे नेतृत्व केले होते. २०१०–२०१३ या काळात त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवले, तर त्याआधी त्यांच्या पत्नी महिला व बालविकास सभापती म्हणून कार्यरत होत्या. त्यामुळे त्यांचे राष्ट्रवादीशी असलेले जुने नाते सर्वश्रुत आहे. मात्र, २०१३ नंतरच्या बदलत्या राजकीय समीकरणात त्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला होता.
गेल्या काही महिन्यांपासून ओल्लालवार पक्षांतर्गत जुन्या – नव्या नेत्यांवाद, स्थानिक नाराजी आणि अंतर्गत गटबाजीमुळे अस्वस्थ असल्याची चर्चा होती. त्याचेच पुढे रूपांतर होत त्यांनी ‘घरवापसी’चा निर्णय घेतला. त्यांच्या या पावलामुळे जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर भाजपला मोठे खिंडार पडल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.



