ताज्या घडामोडी

रुग्णवाहिकांच्या कमतरतेवर युवक काँग्रेस आक्रमक

रुग्णवाहिकांच्या कमतरतेवर युवक काँग्रेस आक्रमक; तातडीने समस्या सोडवण्याची मागणी

गडचिरोली, प्रतिनिधी :—

आरोग्य विभागातील रुग्णवाहिकांची तीव्र कमतरता तसेच विविध आरोग्यविषयक समस्या तातडीने सोडवण्यात याव्यात, अन्यथा गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा युवक काँग्रेसने दिला आहे. या संदर्भातील निवेदन गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

गडचिरोली जिल्हा हा आदिवासी व दुर्गम म्हणून ओळखला जातो. गडचिरोलीसह चंद्रपूर जिल्ह्यातील सावली, मूल, ब्रह्मपुरी, नागभीड आदी तालुक्यांतून दररोज मोठ्या प्रमाणावर गंभीर रुग्ण उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होत असतात. त्यामुळे जिल्हा रुग्णालयावर रुग्णांचा ताण सातत्याने वाढत आहे.

दररोज अपघातग्रस्त गंभीर रुग्ण दाखल होत असून, त्यांना तातडीने नागपूर येथील शासकीय रुग्णालयात रेफर करणे आवश्यक ठरते. मात्र १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे रेफर प्रक्रियेत मोठा विलंब होत आहे. यामुळे काही वेळा उपचारादरम्यान किंवा प्रवासातच रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनाही घडल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

सद्यस्थितीत गडचिरोली जिल्ह्यात १०२ व १०८ क्रमांकाच्या एकूण ५५ रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. मात्र यापैकी केवळ १० रुग्णवाहिका १०८ क्रमांकाच्या आहेत. त्यामधील दोन रुग्णवाहिका जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी, तर एक रुग्णवाहिका महिला व बाल रुग्णालयासाठी राखीव आहे. उर्वरित सात रुग्णवाहिका तालुकास्तरावरील रुग्णालयांमध्ये वापरण्यात येत असल्याने जिल्हा रुग्णालयासाठी १०८ रुग्णवाहिका अत्यंत अपुऱ्या ठरत असल्याचे युवक काँग्रेसने निदर्शनास आणून दिले.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र दिसून येत आहे. रुग्णवाहिकांची कमतरता तसेच इतर आरोग्यविषयक समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे.

त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात तातडीने १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांची संख्या वाढविण्यात यावी व आरोग्य सेवेशी संबंधित सर्व समस्या त्वरित सोडविण्यात याव्यात, अन्यथा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

सदर निवेदन देताना भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे, गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, नगरसेवक रमेश चौधरी, नंदू कायरकर, नंदू वाईलकर, काँग्रेसचे जिल्हा महासचिव नदीम नाथानी, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोडघरे, जितू पाटील मुनघाटे, अभिजीत घाईत, चामोर्शी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रेमानंद गोंगले, अनिकेत राऊत आदी उपस्थित होते.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker