प्रोजेक्ट उडान अंतर्गत ‘वीर बाबुराव शेडमाके’ सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न

प्रोजेक्ट उडान अंतर्गत ‘वीर बाबुराव शेडमाके’ सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न
२४,८०७ विद्यार्थ्यांचा सहभाग
गडचिरोली | प्रतिनिधी :
गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी आयोजित करण्यात आलेली ‘वीर बाबुराव शेडमाके सामान्य ज्ञान स्पर्धा’ यशस्वीपणे पार पडली.
या उपक्रमात जिल्ह्यातील ११५ शासकीय व निमशासकीय आश्रम शाळांमधील एकूण २४,८०७ विद्यार्थ्यांनी अंतिम परीक्षेत सहभाग घेतला. अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये सामान्य ज्ञान, वाचन संस्कृती व स्पर्धा परीक्षांविषयी आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम गेल्या पाच महिन्यांपासून राबविण्यात येत होता.
पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली PRAYAS उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दररोज व्हॉट्सॲपद्वारे प्रश्न पाठवून नियमित सराव घेण्यात आला. आज २२ जानेवारी २०२६ रोजी या उपक्रमाची अंतिम परीक्षा पार पडली.
परीक्षेत गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे अतिदुर्गम भामरागड उपविभागातील २,३९६ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्यात आला.
या उपक्रमाच्या यशासाठी गडचिरोली पोलीस दलातील अधिकारी, समन्वयक पोलीस कर्मचारी तसेच आश्रम शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.



