देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात,बुलेरो–ट्रक समोरासमोर धडक; चालक कोमात, 10 जण गंभीर जखमी

गडचिरोली, प्रतिनिधी :-
देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या आनंदयात्रेचा शेवट भीषण अपघातात झाला. छलेवाडा येथून मेडाराम येथे देवदर्शन करून परतत असताना बुलेरो वाहन आणि ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात बुलेरो चालक वसंत चव्हाण गंभीर जखमी झाला असून तो कोमात आहे. वाहनातील उर्वरित नऊ प्रवासीही गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना गुरुवारी (दि. 29) घडली.
बुलेरो (क्रमांक MH 33 A 3955) व समोरून येणाऱ्या ट्रकची धडक इतकी भीषण होती की बुलेरोचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला. अपघाताचा आवाज दूरवर ऐकू येताच परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीला धाव घेत जखमींना वाहनातून बाहेर काढले. काही काळातच रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आणि सर्व जखमींना तातडीने भूपणपाली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वाहनाचा वेग व निष्काळजीपणा ही संभाव्य कारणे मानली जात आहेत. संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
या भीषण अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.


