ताज्या घडामोडी

ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील लोहरडोंगरी खाणविरोधी ऑनलाइन मोहिमेला १० हजार स्वाक्षऱ्यांचा भक्कम पाठिंबा

‘स्टॉप लोहरडोंगरी माईन : सेव्ह ताडोबा–ब्रह्मपुरी टायगर कॉरिडॉर’ याचिकेने ओलांडला महत्त्वाचा टप्पा

चंद्रपूर, प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्रप्रकल्पाच्या अत्यंत महत्त्वाच्या ताडोबा–ब्रह्मपुरी व्याघ्र कॉरिडॉरमध्ये प्रस्तावित लोहरडोंगरी लोहखाणीविरोधात सुरू असलेल्या ऑनलाइन जनआंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ‘स्टॉप लोहरडोंगरी माईन : सेव्ह ताडोबा–ब्रह्मपुरी टायगर कॉरिडॉर’ या ऑनलाइन याचिकेला आतापर्यंत १० हजारांहून अधिक नागरिकांनी स्वाक्षऱ्यांद्वारे पाठिंबा दिला असून, देशभरातून पर्यावरणप्रेमींचा सहभाग वाढत आहे.

राज्य वन्यजीव मंडळाने जानेवारी महिन्यात या लोहखाणीला मंजुरी दिली असली, तरी वन्यजीव तज्ज्ञ, पर्यावरण अभ्यासक आणि स्थानिक नागरिकांच्या तीव्र विरोधाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप होत आहे. या खाण प्रकल्पामुळे सुमारे ३५.९४ हेक्टर वनक्षेत्र बाधित होणार असून तब्बल १८,०२४ झाडांची तोड होण्याची शक्यता आहे. यामुळे ब्रह्मपुरी वनविभागातील ६० हून अधिक वाघांचा अधिवास थेट धोक्यात येणार आहे.

गेल्या पाच वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यात मानव–वन्यजीव संघर्षात २०० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी २०२५ साली केवळ ब्रह्मपुरी भागात १८ बळी गेले आहेत. खाणकाम सुरू झाल्यास हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची तसेच हवा व पाणी प्रदूषणात वाढ होण्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर ‘सेव्ह लोहरडोंगरी – सेव्ह ताडोबा’ मोहिमेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे माजी सदस्य बंडू धोतरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जोपर्यंत हा पर्यावरणविरोधी प्रकल्प पूर्णतः रद्द होत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार.”

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker