ताज्या घडामोडीदेश विदेश
एसआयआर विरोधात दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
ममता बॅनर्जी यांनी स्वतः केला युक्तीवाद

नवी दिल्ली, प्रतिनिधी :-
पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या एसआयआर अर्थात मतदार यादी सखोल पडताळणी व सुधारणा मोहिमेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या प्रकरणात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः न्यायालयात युक्तीवाद केला.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने सांगितले की, ही संपूर्ण प्रक्रिया निश्चित कालमर्यादेत सुरू असून, यापूर्वीच दहा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आणखी मुदतवाढ देणे शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र कोणत्याही पात्र मतदाराचे नाव यादीतून वगळले जाणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना करता येतील, असेही न्यायालयाने नमूद केले.
दरम्यान, याचिकाकर्त्यांनी या पडताळणी प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याचा आरोप केला आहे. यावर निवडणूक आयोगाच्या वकिलांनी प्रत्युत्तर देताना, राज्य सरकारकडून आवश्यक अधिकारी उपलब्ध करून न दिल्यामुळे आयोगाला स्वतंत्रपणे अधिकारी नियुक्त करावे लागल्याचे सांगितले.
या प्रक्रियेद्वारे केवळ पश्चिम बंगाललाच लक्ष्य केले जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी न्यायालयात मांडला. या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.



