नवी दिल्ली, प्रतिनिधी :-
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत खलिस्तान समर्थनाच्या घोषणा लिहिल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने मोठी कारवाई करत दोघांना अटक केली आहे. बलजिंदर नावाचा रुग्णवाहिका चालक आणि त्याचा साथीदार रोहित उर्फ कीरत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तपासादरम्यान ‘सिख्स फॉर जस्टिस’ या संघटनेचा म्होरक्या आणि घोषित दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या सांगण्यावरून या दोघांनी हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणामागील मुख्य सूत्रधार दिल्लीतील तिलक नगर परिसरातील रहिवासी असून, २६ जानेवारीपूर्वी तो कॅनडाला पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. तो तेथून थेट पन्नूच्या संपर्कात असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
या संपूर्ण कटाची आखणी कॅनडामध्ये करण्यात आली होती. घोषणाबाजी करण्यासाठी आरोपींना दोन लाख रुपयांचे आमिष दाखविण्यात आले होते. अटक करण्यात आलेले आरोपी स्लीपर सेलप्रमाणे कार्यरत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती विशेष कक्षाकडून देण्यात आली आहे.
Back to top button