ताज्या घडामोडीदेश विदेश

आरोग्य व ग्राहक संरक्षणासाठी राज्यसभेत ३ महत्त्वपूर्ण विधेयके सादर

खा. डॉ. अजित गोपछडेंचा पुढाकार

नवी दिल्ली, प्रतिनिधी :-

केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी धोरणाच्या अनुषंगाने जनतेची आरोग्यसुरक्षा, ग्राहक संरक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी राज्यसभेत खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या माध्यमातून तीन महत्त्वपूर्ण विधेयके सादर करण्यात आली आहेत. या विधेयकांमुळे देशात सुरक्षित, उत्तरदायी आणि आधुनिक वैद्यकीय व ग्राहक सेवा प्रणाली उभारण्याचा उद्देश आहे.

पहिल्या विधेयकात वैद्यकीय ऑक्सिजनचे सुरक्षित उत्पादन, साठवण, वितरण आणि वापर यासाठी कडक तरतुदी करण्यात आल्या आहेत. गुणवत्ता मानके, अनुज्ञापन, तपासणी तसेच उत्कृष्ट उत्पादन प्रक्रिया (जीएमपी) सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय व राज्यस्तरीय प्राधिकरणांची स्थापना करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

दुसऱ्या विधेयकाचा उद्देश डिजिटल प्लॅटफॉर्मवरील वितरण कर्मचाऱ्यांची पडताळणी करून ग्राहक सुरक्षा सुनिश्चित करणे हा आहे. ऑनलाइन खरेदी व घरपोच वितरण सेवांमध्ये वाढ झाल्याने काही ठिकाणी चोरी, दरोडे व अन्यायाच्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले होते. या विधेयकामुळे डिजिटल अर्थव्यवस्थेत विश्वास, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

तिसऱ्या विधेयकाद्वारे सार्वजनिक आरोग्य सेवेत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा सुरक्षित व नैतिक वापर सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला आहे. या अंतर्गत रुग्णसुरक्षा, निदानात्मक संशोधन, वैद्यकीय शिक्षण आणि माहिती संरक्षणासाठी स्वतंत्र नियामक प्राधिकरण स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्यसेवा अधिक दर्जेदार, प्रभावी व आधुनिक होण्यास मदत होणार आहे.

या तीनही विधेयकांचा देशातील वैद्यकीय व्यवस्था, ग्राहक सुरक्षा आणि डिजिटल सेवा क्षेत्रावर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker