सामाजीक

पत्रकारांनी जिल्हाभर केले धरणे आंदोलन

गडचिरोली,प्रतिनिधी :-

पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी आज ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेच्या बॅनरखाली पत्रकांरानी गडचिरोलीसह विविध तालुकास्थळी धरणे आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधले.

गडचिरोली येथे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ चे जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुडमवार यांच्या नेतृत्वात प्रदेश उपाध्यक्ष रोहिदास राऊत, विदर्भ सहसरचिटणीस प्रल्हाद म्हशाखेत्री, साप्ताहिक विंग प्रदेश कार्यकारिणी सदस्य मुकुंद जोशी, जिल्हा सरचिटणीस कैलाश शर्मा, संजय तिपाले, ज्येष्ठ पत्रकार कांतीभाई सूचक, नरेंद्र माहेश्वरी, रेखा वंजारी, जयंत निमगडे, कृष्णा वाघाडे, जगदीश कन्नाके,टॉवर मडावी, तन्मय देशपांडे, मुकेश गेडाम, कालिदास बन्सोड, मनोज वनकर, दिलीप दहेलकर यांच्यासह अन्य पत्रकार उपस्थित होते.

यावेळी खासदार अशोक नेते, प्रभारी जिल्हाधिकारी धनाजी पाटील, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी धरणे आंदोलनाला भेट देऊन पत्रकारांशी चर्चा केली. पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्यास भरीव निधी द्यावा, पत्रकारितेत ५ वर्षे पूर्ण झालेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती प्रदान करण्यात यावी, वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित होणाऱ्या जाहिरातींवर सध्या लागू असलेली जीएसटी रद्द करण्यात यावी, पत्रकारांच्या घरांसाठी विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा, कोरोना साथीच्या काळात जीव गमावलेल्या पत्रकारांना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा देऊन त्यानुसार मृत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे, शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण ‘क’ वर्ग (लघु दैनिक) दैनिकांना मारक आहे. या दैनिकांना आणि साप्ताहिकांनाही मध्यम दैनिकांएवढ्याच जाहिराती देण्यात याव्यात इत्यादी मागण्यांचे निवेदन खासदार अशोक नेते व धनाजी पाटील यांना देण्यात आले.

या मागण्या मंजूर करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर निवेदन पाठविण्याचे आश्वासन प्रभारी जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी दिले. खा.अशोक नेते यांनी पत्रकारांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवून मागण्यांसंदर्भात आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अशी ग्वाही दिली.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker