छ्तीसगडताज्या घडामोडीदेश विदेश
नक्षलविरोधी मोहिमेत सुरक्षा दलाला मोठं यश; २२ माओवाद्यांचे आत्मसमर्पण

गडचिरोली, प्रतिनिधी :
छत्तीसगडमध्ये सुरू असलेल्या व्यापक नक्षलविरोधी कारवाईत सुरक्षा दलाला महत्त्वपूर्ण यश मिळालं आहे. सुकमा जिल्ह्यात २२ माओवाद्यांनी आत्मसमर्पण करत हिंसेचा मार्ग कायमचा सोडण्याचा निर्णय घेतला. जिल्हा पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलांच्या उपस्थितीत त्यांनी शस्त्रास्त्रांसह आत्मसमर्पण केलं.
हे आत्मसमर्पण राज्य सरकारच्या ‘पुना मार्गम’ (पुनर्वसनासाठी नवी दिशा) या विशेष मोहिमेअंतर्गत झालं आहे. या मोहिमेचा उद्देश माओवादी विचारसरणीपासून दूर जाऊन युवकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा आहे. गेल्या काही महिन्यांत सुरक्षा दलांनी सातत्याने जंगल भागात शोधमोहीम, गस्त आणि जनजागृती अभियान राबवल्यामुळे अनेक माओवादी संघटनेतून बाहेर पडण्यास पुढे येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना पुनर्वसन धोरण–२०२६ अंतर्गत प्रत्येकी ५० हजार रुपयांची तात्काळ आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच त्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी, निवास आणि इतर शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. काहींवर गंभीर गुन्हे दाखल नसल्यामुळे त्यांना कायदेशीर प्रक्रियेनंतर सवलती मिळू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.
‘नक्षलमुक्त बस्तर’ हे राज्य सरकारचं प्रमुख उद्दिष्ट असून, स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाच्या प्रयत्नांना प्रतिसाद दिला आहे. आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांनी जंगलातील कठीण जीवन, सततचा दबाव आणि विकासापासून दूर राहणं यामुळे त्यांनी मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं.



