ताज्या घडामोडीदेश विदेश
गडचिरोली जिल्ह्यातील ४४ माओवादी स्मारके उध्वस्त
पोलीस व सीआरपीएफचे संयुक्त अभियान

गडचिरोली, प्रतिनिधी :-
माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक मानली जाणारी जिल्हाभरातील तब्बल ४४ माओवादी स्मारके गडचिरोली पोलीस दल व सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईत उध्वस्त करण्यात आली. सी-६०, सीआरपीएफ आणि जिल्हा पोलीस दलाच्या १८ पथकांतील सुमारे ८०० जवानांनी एकाच दिवशी ही मोठी मोहीम राबविली.
दुर्गम व अतिदुर्गम भागामुळे संवेदनशील मानल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांनी जनतेमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी अनेक ठिकाणी स्मारके उभारली होती. गेल्या काही वर्षांत पोलीस दलाने राबविलेल्या प्रभावी माओवादविरोधी कारवायांमुळे या चळवळीवर मोठा आळा बसला असून उरलेली दहशतीची प्रतीके नष्ट करण्याच्या उद्देशाने हे विशेष अभियान हाती घेण्यात आले.
या मोहिमेत १६ बीडीडीएस पथक, विशेष अभियान पथक तसेच विविध पोलीस पोस्ट व उपपोस्टांतील जवानांनी जंगल परिसरात शोधमोहीम राबवून एकूण १५ हद्दींमधील ४४ स्मारके शोधून काढली व ती नष्ट केली. यामध्ये एटापल्ली उपविभागातील १८, हेडरी उपविभागातील १७, भामरागडमधील ५, जिमलगट्टा येथील २ तसेच धानोरा व पेंढरी उपविभागातील प्रत्येकी १ स्मारकाचा समावेश आहे. पेनगुंडा, कवंडे, तुमरकोठी, गर्देवाडा, वांगेतुरी व गट्टा परिसरातील स्मारकेही या कारवाईत उध्वस्त करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, कार्तिक मधीरा, गोकुल राज जी. तसेच पोलीस उपअधीक्षक विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या मोहिमेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली असून माओवादी प्रभाव कमी करण्यासाठी पोलीस दल सातत्याने कार्यरत राहील, असे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.




