आपला जिल्हाताज्या घडामोडी
ध्वनीक्षेपक वापरास १५ दिवसांची सशर्त सुट; सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत परवानगी

गडचिरोली, प्रतिनिधी :-
केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, २०१७ अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांना वर्षातून १५ दिवस ध्वनीक्षेपक वापरास सशर्त सवलत देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अविष्यान्त पंडा यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्याशी सल्लामसलत करून सन २०२६ साठी ठरावीक १५ दिवस सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरण्यास परवानगी जाहीर केली आहे.
या सवलतीमध्ये शिवजयंती (१९ फेब्रुवारी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल), ईद-ए-मिलाद (२६ ऑगस्ट), गणेशोत्सवाचे चार दिवस (२०, २३, २४, २५ सप्टेंबर), नवरात्रोत्सवाचे चार दिवस (१९, २०, २१, २२ ऑक्टोबर), दिवाळी लक्ष्मीपूजन (८ नोव्हेंबर), ख्रिसमस (२५ डिसेंबर) आणि ३१ डिसेंबर २०२६ या दिवसांचा समावेश आहे.
ही सवलत श्रोत्यगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे व मेजवानी कक्ष वगळता इतर ठिकाणी लागू राहणार आहे. मात्र ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० व सुधारित नियम २०१७ मधील तरतुदींचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहील. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निश्चित ध्वनी मर्यादा पाळण्याची जबाबदारी संबंधित आयोजकांवर राहणार आहे.



