मुंबई, प्रतिनिधी :-
राज्यातील सुमारे दोन लाख आयटीआय विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी अनिरुद्धाज् अॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आणि कौशल्य विभागाअंतर्गत कार्यरत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
राज्य व देश अधिक सशक्त करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असून, या उपक्रमांतर्गत आयटीआय विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन व बचावकार्याचे व्यावहारिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत तत्परतेने मदत करण्याची क्षमता विकसित होणार असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी सांगितले.
आपत्ती व्यवस्थापन व बचावकार्याचे प्रशिक्षण केवळ विद्यार्थ्यांनीच नव्हे तर प्रत्येक नागरिकाने घेणे आवश्यक असल्याचे आवाहनही त्यांनी केले. या उपक्रमामुळे आपत्ती काळात प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होऊन समाजसेवा आणि राष्ट्रसेवेला बळ मिळणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Back to top button