आपला जिल्हाताज्या घडामोडी

माओवादाविरुद्ध लढणाऱ्या सी-६० जवानांना विशेष ‘सी-६० पदक’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, प्रतिनिधी :-

माओवादाविरोधातील लढ्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सी-६० पथकातील जवानांना राज्य शासनामार्फत विशेष ‘सी-६० पदक’ देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. किमान तीन वर्षे सी-६० पथकात सेवा बजावलेल्या जवानांना हा सन्मान दिला जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पोलीस महासंचालक कार्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अर्धवार्षिक परिषद पार पडली. यावेळी गृह राज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर, गृह राज्यमंत्री (शहरे) योगेश कदम, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्रात माओवादाची चळवळ आता नगण्य पातळीवर आली असून गडचिरोलीसारख्या भागात विकासाचे नवे चित्र दिसू लागले आहे. मात्र, या चळवळीचे पुनरुज्जीवन रोखणे हे पुढील मोठे आव्हान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माओवादविरोधी लढ्यात आतापर्यंत २४४ पोलीस कर्मचारी शहीद झाले असून ६०९ नागरिकांनी प्राण गमावले आहेत, असे त्यांनी नमूद केले.

पोलीस यंत्रणेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर भर देत त्यांनी गुन्हे तपास प्रक्रियेत पूर्णपणे डिजिटल प्रणाली लागू करण्याचे निर्देश दिले. पुरावे संकलन, आरोपपत्र दाखल करणे आदी सर्व प्रक्रिया डिजिटल केल्यास तपास अधिक अचूक व पारदर्शक होईल, असे त्यांनी सांगितले. पुराव्यांमध्ये छेडछाड रोखण्यासाठी प्रगत प्रणाली राज्यभर लागू करण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला.

गुन्ह्यांमध्ये दोषारोप सिद्ध होण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी ठोस कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देश देत त्यांनी अपयशी ठरलेल्या प्रकरणांचे विश्लेषण करण्यास सांगितले. तसेच पोलीस व सरकारी वकिलांच्या कामगिरीचे स्वतंत्र मूल्यमापन करण्यासाठी प्रणाली विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे.

रस्ते अपघातांमध्ये मृत्यूदर कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, तसेच सायबर सुरक्षेसाठी सामाजिक माध्यमांशी प्रभावी समन्वय साधावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. सायबर गुन्हे आणि कट्टरतावाद रोखण्यासाठी सक्रिय उपाययोजना करण्याचेही निर्देश देण्यात आले.

पोलीस दलातील अंतर्गत संवाद वाढवण्याचे महत्त्व अधोरेखित करत, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कनिष्ठांशी संवाद साधावा आणि जनतेशीही विश्वासाचे नाते निर्माण करावे, असे आवाहन त्यांनी केले. गुन्हेगारीविरोधात ‘शून्य सहनशीलता’ धोरण कठोरपणे राबवण्याचे आदेश देत अंमली पदार्थांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरमहा पुरस्कार योजना सुरू करण्याचा प्रस्तावही मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडला. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker