आपला जिल्हाताज्या घडामोडी

नक्षलवाद्यांनी लोकशाही मार्ग स्विकारावा : गडचिरोलीत डाव्या पक्षांचे आवाहन

गडचिरोली, प्रतिनिधी :-

भारत हा लोकशाही मूल्यांवर आधारित देश असून संविधानिक मार्गानेच जनतेच्या समस्या सोडवता येतात. बंदुकीच्या जोरावर सामान्य नागरिकांना न्याय मिळू शकत नाही, त्यामुळे जंगलात उरलेल्या नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून लोकशाहीचा स्वीकार करावा, असे ठाम आवाहन गडचिरोलीतील डाव्या पक्षांच्या नेत्यांनी केले आहे.

केंद्रीय गृह विभागाने ३१ मार्च हा नक्षलवाद्यांसाठी अंतिम अल्टीमेटम दिल्यानंतर या पार्श्वभूमीवर एटापल्ली तालुक्यातील दौऱ्यावर असताना शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. अमोल मारकवार आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील नोंद असलेल्या शेवटच्या नक्षलवाद्यांपैकी एक जयराम उर्फ नंदू मोंगे गावळे यांच्या गिलनगुडा येथील घरी भेट दिली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत जयरामने हिंसेचा मार्ग सोडून लोकशाही प्रक्रियेत सहभागी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

डाव्या पक्षांच्या नेत्यांनी सांगितले की, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांसारख्या संघटनांनी अनेक दशकांपासून संसद, विधिमंडळ आणि जनआंदोलनांच्या माध्यमातून जनतेच्या हक्कांसाठी लढा दिला आहे. रोजगार हमी योजना, पेसा कायदा, वनाधिकार कायदा यांसारख्या महत्त्वपूर्ण कायद्यांची अंमलबजावणी ही लोकशाही मार्गाने झालेल्या संघर्षाचेच फलित आहे. त्यामुळे बंदुकीच्या मार्गाने जनतेचे भले होऊ शकते ही कल्पना वास्तवात टिकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, जे नक्षलवादी हिंसेचा त्याग करून लोकशाही मार्ग स्वीकारतील, त्यांचे डाव्या पक्षांमध्ये स्वागत करण्यात येईल. समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन शांततामय पद्धतीने जनतेसाठी कार्य करण्याची संधी उपलब्ध आहे.

“नंदूने परत यावे” – वडिलांचे भावनिक आवाहन

दरम्यान, जयराम उर्फ नंदू यांचे वडील मोंगे गावळे यांनी अत्यंत भावनिक शब्दांत आपल्या मुलाला घरी परत येण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, घरातील किरकोळ कारणावरून रागावून नंदू घर सोडून गेला आणि नंतर नक्षल चळवळीत सहभागी झाला. तेव्हापासून तो घरी परतलेला नाही.

आज परिस्थिती बदलली असून अनेक वरिष्ठ नक्षलवादी शरण आले आहेत. अशा स्थितीत जंगलात राहण्यापेक्षा नंदूने चळवळ सोडून कुटुंबाकडे परत यावे, अशी हाक त्यांनी दिली. या भावनिक आवाहनामुळे उपस्थितांमध्येही हळहळ व्यक्त करण्यात आली.

गडचिरोली जिल्ह्यात मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण झाले असून, प्रशासनाच्या मोहिमा आणि पुनर्वसन योजनांमुळे नक्षलवादाची पकड कमी होत चालली आहे. अशा परिस्थितीत राजकीय पक्ष, प्रशासन आणि कुटुंबीयांकडून होत असलेले आवाहन नक्षलवादाच्या उर्वरित घटकांवर परिणामकारक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker