आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीय
“काँग्रेसचे नैराश्यातून बेछूट आरोप; कथित एमआयडीसी प्रकरणाचा राजकारणासाठी वापर” – भाजपचा पलटवार

गडचिरोली, प्रतिनिधी :-
जिल्ह्यातील एमआयडीसी प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असून, काँग्रेसकडून करण्यात आलेल्या आरोपांना भारतीय जनता पक्षाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पत्रकार परिषदेत विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बळकावण्याचा आरोप केला होता. त्यावर भाजपकडून काँग्रेसवर “नैराश्यातून बेछूट आरोप” केल्याचा पलटवार करण्यात आला.
भाजप पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, गडचिरोली जिल्ह्याची ओळख पूर्वी नक्षल प्रभावित जिल्हा अशी होती. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात औद्योगिक विकासाची मुहूर्तमेढ रोवली गेली असून, युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.
भेंडाळा व परिसरातील १४ गावांच्या एमआयडीसी संदर्भातील प्रश्नावर काँग्रेसकडून राजकारण केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. संबंधित क्षेत्राची एमआयडीसीसाठी निवड ही पूर्वीच झालेली असून, प्रशासनाकडून याबाबत चाचपणी सुरू असताना भाजपवर आरोप करणे चुकीचे असल्याचे भाजपने म्हटले.
भाजपने पुढे सांगितले की, शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कोणतीही जमीन कोणत्याही कंपनीला दिली जाणार नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे या विषयावर शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी भाजप ठामपणे उभा आहे. शेतकरी आंदोलन हे सर्वपक्षीय असल्याचे नमूद करत, काँग्रेसने त्यातून राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला.
राजकीय तापमान तापले :-
एमआयडीसी प्रकरणावरून जिल्ह्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



