ताज्या घडामोडीदेश विदेश

गडचिरोलीत ९ वरिष्ठ माओवाद्यांचे आत्मसमर्पण; एके-४७सह शस्त्रसाठा जप्त

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोली जिल्ह्यात माओवादाविरोधातील कारवायांना आणखी यश मिळत ९ वरिष्ठ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दल व सीआरपीएफसमोर आत्मसमर्पण केले. यात ३ एसीएम दर्जाच्या माओवाद्यांसह एकूण ९ जणांचा समावेश असून त्यांच्या डोक्यावर एकूण ३० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते.

आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांमध्ये दसरी ऊर्फ पिडे सन्नु वेको, रामजी अडमा पोटाम, शांती वंजा वड्डे (एसीएम) यांच्यासह मनकु मासो पोडाम, सरिता रामा वेलकम, लखमी आयतु कुंजाम, नंदे जोगा मडे, राकेश कोरके मज्जी आणि सुक्की बामी कुंजाम यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे शांती वंजा वड्डे हिने एके-४७ रायफल व जिवंत काडतुसे तर सुक्की बामी कुंजाम हिने कार्बाईन रायफलसह आत्मसमर्पण केले. तसेच आत्मसमर्पित माओवाद्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कुमनार जंगल परिसरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. यात एके-४७ रायफल, मॅगझिन, काडतुसे, वॉकीटॉकी व अन्य साहित्याचा समावेश आहे. याशिवाय अन्य ठिकाणीही कारवाई करून एसएलआर रायफल, डेटोनेटर व इतर साहित्य हस्तगत करण्यात आले.

गडचिरोली पोलीस व सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईमुळे माओवाद्यांमध्ये आत्मसमर्पणाची प्रवृत्ती वाढत असून २०२५ पासून आतापर्यंत एकूण १३२ माओवाद्यांनी शस्त्रे टाकली आहेत. एकूण आकडा आता ८०५ वर पोहोचला आहे.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफचे उप-महानिरीक्षक अजय कुमार शर्मा, कमांडंट परविंदर सिंग यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. अधिकाऱ्यांनी उर्वरित माओवाद्यांनाही हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचे आवाहन केले.

दरम्यान, शासनाच्या पुनर्वसन योजनांमुळे आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांना आर्थिक मदत, रोजगार व पुनर्वसनाची संधी उपलब्ध होत असल्याने अधिकाधिक माओवादी मुख्य प्रवाहात येत असल्याचे चित्र आहे.

नक्षलवादी ची पूर्ण माहिती वाचा –

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker