आपला जिल्हाताज्या घडामोडी
दुःखद : ज्येष्ठ समाजसेवक डॉ. शिवनाथजी कुंभारे यांचे निधन; परिसरात शोककळा

गडचिरोली, प्रतिनिधी :-
झाडीपट्टी प्रदेशातील थोर समाजसेवी व्यक्तिमत्व, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ज्येष्ठ अनुयायी आणि विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक संस्थांचे मार्गदर्शक डॉ. शिवनाथजी कुंभारे (वय ७९, गडचिरोली) यांचे आज दुपारी ११ वाजता वृद्धापकाळाने त्यांच्या निवासस्थानी दुःखद निधन झाले.
त्यांच्या निधनामुळे गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मनमिळावू स्वभाव, सेवाभावी वृत्ती आणि कार्यतत्परतेमुळे त्यांनी अनेकांना प्रेरणा दिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मानवतावादी व परिवर्तनवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर अविरत कार्य केले.
डॉ. कुंभारे यांनी कर्मयोगी तुकारामजीदादा गीताचार्य (अड्याळ टेकडी) तसेच पद्मश्री अण्णा हजारे (राळेगण सिद्धी) यांच्यासोबत दीर्घकाळ सामाजिक कार्य केले. विशेषतः दुर्गम व नक्षलग्रस्त आदिवासी भागात त्यांनी आरोग्य सेवा व समाजकल्याणासाठी स्वतःला झोकून दिले. सुमारे ५० वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी असंख्य गरजू नागरिकांना आधार दिला.
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे माजी जिल्हा सेवाधिकारी म्हणूनही त्यांनी कार्य केले. तसेच राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद, गडचिरोली सायकल स्नेही मंडळ, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समिती, झाडीबोली साहित्य मंडळ, जिल्हा दारूबंदी अभियान आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आदी विविध संस्थांमध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले.
गडचिरोली येथे झालेल्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते.
त्यांच्यावर आज सायंकाळी गडचिरोली येथील कठानी नदी किनारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.



