आपला जिल्हाक्राईम

दुकानफोडीचा गुन्हा उघड; तीन आरोपी ताब्यात, दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोली शहरातील रामनगर परिसरातील माऊली मोबाईल शॉपचे शटर फोडून मोबाईल, अॅक्सेसरीज व रोख रक्कम चोरणाऱ्या आरोपींचा पर्दाफाश करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात एका आरोपीस अटक करण्यात आली असून दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून सुमारे 1 लाख 50 हजार रुपयांचे मोबाईल व इतर साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, रामनगर वार्ड क्रमांक 11 येथील रहिवासी अनिरुद्ध दिकोंडवार यांचे माऊली मोबाईल शॉप 24 मे 2026 रोजी रात्री बंद असताना अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप लोखंडी रॉडने तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी विविध कंपन्यांचे 9 मोबाईल हँडसेट, मोबाईल अॅक्सेसरीज आणि रोख रक्कम असा एकूण 98 हजार 690 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता.

या प्रकरणी 26 मे रोजी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी घटनास्थळी कोणतेही ठोस पुरावे न सोडल्यामुळे तपास पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होता. मात्र तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला.

तपासादरम्यान रोहन व्यंकट दर्रो (वय 22, रा. मुरमाडी, ता. धानोरा) याच्यासह दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर चोरीस गेलेले 10 मोबाईल फोन व एक आयफोनसह एकूण 1 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मुख्य आरोपी रोहन दर्रो याला अटक करण्यात आली असून दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनराज कोळी करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे दुकानफोडीचा हा गुन्हा उघडकीस येऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker